शिवसेनेला पाठिंबा देण्यास संजय निरुपम यांचा नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे सूचित केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून सरळसरळ दोन गट पडले आहेत. दरम्यान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी "शिवसेना हा काही माझा शत्रू नाही', असे वक्तव्य केलेले असताना कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. कामत यांनी आपला हा विरोध ट्‌विट करून जाहीर केला आहे. तर निरुपम यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत विचारणा केली होती. मात्र आम्ही पाठिंब्याला नकार दिला आहे. मात्र महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत छोट्या पक्षांना सोबत घेऊन उमेदवार उभे करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गुरुदास कामत यांनीही शिवसेनेला विरोध केला असून, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आपण आपल्या भावना कळवल्या असल्याचे कामत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कामत यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. कामत यांनी ट्‌विटमध्ये म्हणाले, "महापालिकेसाठी शिवसेनेसोबत जाणे किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अशा प्रकारच्या चर्चेला माझा ठाम विरोध आहे. आम्ही शिवसेना आणि भाजप या समाजात फूट पाडणाऱ्या दोन्ही पक्षांविरोधात लढलो आहोत. आपण जर या पक्षांना पाठिंबा दिला तर जनता आपल्याला माफ करणार नाही.'

शिवसेना आणि भाजपला त्यांच्या समस्या त्यांनाच सोडवू द्या. यातून त्यांच्यामध्ये असलेले सत्तेसाठीचे हपापलेपण जनतेसमोर येऊ द्या', असे आवाहनही कामत यांनी कॉंग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

'कॉंग्रेस पक्षापुढे सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मुंबईत पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबत पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील''
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Web Title: do not support to shivsena oppose by sanjay nirupam