कौतुकास्पद! 'या' डॉक्टर दाम्पत्याने केले मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 25 मे 2020

  • डॉक्टर दाम्पत्य वाटतेय मोफत होमिओपॅथी औषधे
  • 40 हजार लोकांना मोफत गोळ्यांचे वाटप :
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही वाटप

मुंबई : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये खारीचा वाटा सायन प्रतीक्षा नगर मधील डॉक्टर दाम्पत्याने उचलला आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी प्रबोध व नेत्रा गायकवाड दाम्पत्याने स्वखर्चाने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी यांना मोफत वाटप केले आहे. त्यांच्यासह प्रतीक्षा नगर, वडाळा, सायन परिसरातील तब्बल 40 हजार लोकांना या गोळ्या आठवडाभरात देण्यात आल्या आहेत.

बेरोजगारांनी घराचे भाडे कसे द्यायचे? उपासमारीमुळे परप्रांतीयांच्या वस्त्या ओस

श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे परिणाम दिसत असल्याचे आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाच्या निर्देशानुसार सामाजिक संस्था, संघटनांकडून नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांचा जीव वाचविण्यासाठी 24 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रबोध गायकवाड सरसावले आहेत. होमिओपॅथी स्टोअर मध्ये ही औषधे उपलब्ध नसल्याने गायकवाड यांनी स्वतःच सर्व काळजी घेत घरीच औषधे बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना शैलेश ठाकूर यांनी साथ लाभली. सुरुवातीला सोसायटी मध्ये जाऊन लोकांना औषधे वाटप सुरू केल्याने त्यांच्याकडे औषधांची मागणी वाढली आहे.

अरे चाललंय काय? कोरोनाग्रस्त गर्भवती महिला 6 तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

आठवडाभरात त्यांनी सायन, वडाळा मधील झोपडपट्टी आणि सोसायट्यांमधील सुमारे 40 हजार लोकांना मोफत औषधे वितरित केली आहेत. तसेच बंदोबस्तावर असलेले पोलीस, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी यांना ही औषधे वाटप केली आहेत. या उपक्रमासाठी त्यांना लोकांकडून आर्थिक मदतीची विचारणा झाली. मात्र गायकवाड यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. यासाठी सायन प्रतीक्षा नगर मधील काही सजग नागरिकही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

हवी सरकारची मदत
सध्या गायकवाड यांना औषधे तयार करण्यासाठी साहित्याची कमतरता भासत आहे. औषधांसाठी आवश्यक दाणे, 1 ग्रामचे ड्रम आणि अर्सेनिक अल्बम या लिक्विड हे औषध सरकारने उपलब्ध करून दिल्यास मुंबई आणि राज्याच्या खेडोपाड्यातील लोकांना ही औषधे उपलब्ध करून देऊ शकतो, असा विश्वास प्रबोध गायकवाड यांनी व्यक्त केला. झोपडपट्टी, वयोवृद्ध आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

VIDEO! मुंबईतील पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडनं केला असा सराव
......
धारावीकरांना औषधे देण्याचा प्रयत्न
धारावीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही गायकवाड म्हणाले. मुंबई ही आर्थिक नगरी आहे, ती जगली पाहिजे यासाठी आपण हा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor couple distributed free homeopathic medicines