अहमदाबादच्या तरुणाने सोशल मिडीयावर टाकली अशी पोस्ट आणि...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

एका सिंधी तरुणाला कोरोना व्हायरसची संशयित लागण झाली असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे, अशी पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाल्यामुळे उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या डॉक्‍टरांची तारांबळ उडाली.

उल्हासनगर : एका सिंधी तरुणाला कोरोना व्हायरसची संशयित लागण झाली असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे, अशी पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाल्यामुळे उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या डॉक्‍टरांची तारांबळ उडाली. शेवटी अहमदाबादमधील एका तरुणाने संशयित कोरोना झाल्याचे स्टेट्‌स ठेवल्याने हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाल्याने ही अफवा असल्याचे उघड झाले आणि डॉक्‍टरांचा जीव भांड्यात पडला. 

विशाल रंगलानी या तरुणाला संशयित कोरोना झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो महारथी सोसायटीत राहतो, अशा आशयाची पोस्ट समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांना स्थानिकांचे फोन येऊ लागले. एवढेच नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील त्यांच्याकडे फोन करून प्रकाराची माहिती घेतली, पण तसे काहीच नसून रुग्णालयात एकही कोरोनाचा संशयित रुग्ण नसल्याचे डॉ. शिंदे यांनी सर्वांना सांगितले. 

ही बातमी वाचा ः भूमीगत मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार

विशाल रंगलानी हा अहमदाबादमध्ये राहत असून त्याने तोंडाला मास्क लावलेला डीपी ठेवला होता. तसेच मला संशयित कोरोना झाला असून शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याचे स्टेट्‌स त्याने ठेवले होते. हाच डीपी व स्टेट्‌स मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमात प्रसारित झाल्यामुळे त्याबाबतची चौकशी करणारे शेकडो फोन विशाल याला हितचिंतकांनी केले. शेवटी मला कोरोना झाला नसून मी फक्त डीपी व स्टेट्‌स ठेवला होता, असा व्हिडीओ विशाल रंगलानी याने समाजमाध्यमात प्रसारित केला. कोरोनाच्या भीतीने नागरिक अगोदरच भयभीत झाले असून त्यावर अशी थट्टा-मस्करी नागरिकांत अधिक भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते; त्यामुळे असे प्रकार टाळावेत असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors rush in because of posts made by young men on social media