जीव मुठीत घेऊन कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पगारच नाही; शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे आंदोलन!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 May 2020

  • शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे आंदोलन!
  • कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय करण्याचे आश्वासन

चेंबूर: गोवंडी येथील पं. मदन मालविया शताब्दी रुग्णालयात कोरोनाचा विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांनी विविध मागण्यांसाठी त्यांनीकाम बंद आंदोलन केले.

धक्कादायक! व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करुन अवैध मद्य वाहतूकीचा प्रयत्न!

शताब्दी रुग्णालयातील तीन डॉक्टर, 25 पेक्षा अधिक परिचारिका, कर्मचारी कोरोना बाधित आहेत. तर एक वार्ड बॉयचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यातच कोरोना विभाग सुरू केल्याने सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. जीव मुठीत घेऊन काम करूनही डॉक्टरांचा पगार अद्याप न आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. तर कोरोना विभाग सुरू झाल्याने रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणीतील कामगारांना आजूबाजूच्या ठिकाणी हॉटेल, गेस्ट हाऊस, रिकामी इमारतीत राहण्याची सोय करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जेणेकरून रुग्णालयात जर कोरोनाची लागण झाली तर कुटुंबाला संसर्ग होण्याचा धोका होणार नाही.

मात्र, या प्रमुख मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सर्वच जण या कामबंद आंदोलनात उतरले. अखेर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांची बीएआरसी मधील रिकाम्या इमारतीत तर काही जणांची हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

नवी मुंबईची लवकरच रेडझोनमधून सुटका? बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

गोल्फ क्लबच्या जागेवर रुग्णालय उभारा! 
चेंबूर येथील गोल्फच्या 10 एकर मोकळ्या जागेत कोरोनाचे तात्पुरते रुग्णालय उभारावे अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली. या ठिकाणी जर तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारले तर हजारोच्या संख्येने रुग्णासाठी बेड उपलब्ध होतील. निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्यावर उपचार करण्यास सुलभ होईल. अल्प व मध्यम लक्षणांच्या रुग्णांना या ठिकाणी ठेवावे अशी सूचना त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors who treat corona with their salary are not paid; Employees' agitation with doctors at Shatabdi Hospital!