महापूरात कुत्र्यांनी वाचविले ४७ शेळ्यांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

 यावेळी शेळ्यांची चार पिले बुडत असताना कुत्र्यांनी त्यांना तोंडात पकडून सुरक्षीत ठीकाणी नेत त्यांचे प्राण वाचविले. 

निलंबूर : मागील काही दिवस महाराष्ट्रात पूराने थैमान घातले होते, यावेळी अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर काहींचा सर्वच्या सर्व संसारच वाहून गेला. सर्वात दुर्दैवी म्हणजे पूरात कित्येक मुक्या जनावरांना देखील आपले प्राण गमवावे लागले होते. अशीच काहीशी परिस्थिती केरळमध्ये देखील झाली होती. मात्र केरळमध्ये एक अनोखा किस्सा समोर आला, काही मुक्या जनावरांचा प्राण त्यांच्याच काही साथीदारांनी वाचवला असून यात ५ कुत्र्यांनी देवदूत बनून सोबतच्या ४७ शेळ्य़ांचा आणि कोंबड्याचा प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. 

जानकी अम्मा आणि त्यांचे कुटूंब निलंबूर तालुक्यातील नेडुमक्‍याम येथील आदिवासी वस्तीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पाच कुत्रे, ४७ शेळ्या आणि काही कोंबड्या देखील राहतात. मात्र ८ ऑगस्ट रोजी जेव्हा पूराने जोर धरला त्यावेळेस जानकी यांच्या गावातील लोकांना सरकारने सुरक्षेच्या दृष्टिने सुरक्षित स्थळी पोहोचवले. यावेळी जानकी यांना मनाविरूद्ध आपल्या सर्व पाळीव जनावरांना सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले.

या दरम्यान त्यांची जनावरे जेथे होती तिथे भरपूर प्रमाणात पाणी भरले, त्यावेळेस कसेबसे करीत काही शेळ्या आणि कोंबड्या या उंच ठिकाणी गेल्या ख-या मात्र काही छोट्या शेळ्यांना तिथवर जाता येत नव्हते, त्यावेळेस तेथील कुत्र्यांनी त्या शेळ्यांना स्वत:च्या पिल्लांप्रमाणे तोंडात पकडून उंच ठिकाणी नेऊन ठेवले. अशारीतीने कुत्र्यांनी सर्वच्या सर्व प्राण्यांची आपल्या पिल्लांप्रमाणे काळजी घेत त्यांचा जीव वाचवला. 

चार दिवसानंतर पूर ओसरल्यानंतर जेव्हा जानकी या पुन्हा आपल्या घरी आल्या तेव्हा त्यांनी आपल्या सर्व जनावरांना एकत्रित एका जागी पाहिले. त्यावेळेस त्यातील काहीजण भुकेने आशक्त झाले होते मात्र जानकी यांनी त्या सर्वांची काळजी घेतली. त्यावेळेस तेथील एका स्थानिक संस्थेने कुत्रे आणि शेळ्यांसाठी अन्नदान देखील केले ज्यातून त्यांचा जीव वाचविण्यास मदत झाली.

अखेरता या घटनेतुन प्रत्येक माणसाला काहीतरी शिकण्यासारखा आहे हे नक्की, कोणत्याही संकटात स्वत:पेक्षा इतरांचा विचार करणे हे अधिक महत्त्वाचे असते आणि त्यातूनच माणुसकी टिकून राहणार आहे. हि मोलाची शिकवण दूतरूपी श्वानांनी माणसाला दिली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dogs rescued 47 goats in keral floods