esakal | पायाभूत सुविधांकडे KDMC चे दुर्लक्ष; नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन | Strike
sakal

बोलून बातमी शोधा

People strike

पायाभूत सुविधांकडे KDMC चे दुर्लक्ष; नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : परिसरात रस्ते धड नाहीत, मलनिस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन नाही, गटारांची बांधणी नाही एवढेच काय वाहतुकीसाठी साधनांचीही (Civic problems) सुविधा नाही. नव्याने बांधकामांना परवानगी देताना पायाभूत सुविधांकडे (Basic Facilities) मात्र पालिका प्रशासन (KDMC) दुर्लक्ष करते. वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने खंबाळपाडा, भोईरवाडी परिसरातील नागरिकांनी काळ्या फिती लावून मानवी साखळी आंदोलन (people Strike) करीत रविवारी पालिका प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा: मुंबई : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, संस्थाचालकांची जय्यत तयारी

डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा आणि भोईर वाडी परिसरात अनेक गृहनिर्माण संस्था असून 5 ते 6 हजार नागरिक या परिसरात राहतात. तसेच या भागात अनेक बांधकामे नव्याने उभी रहात आहेत. महापालिका एकीकडे बांधकामांना परवानगी देत असताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे. भोईरवाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, मलनिस्सारण व्यवस्था आणि अस्वच्छता याला सर्वस्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून, अनेक वेळा पाठपुरावा करूनही येथील परिस्थिती आहे तशीच असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यात लहान मुले, महिला, रिक्षाचालक आणि रहिवासी सहभागी झाले होते.

हेही वाचा: शाहरुखच्या मुलाला एनसीबीने घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

अनेक वर्ष येथील रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे. आम्ही जवळपास 10 ते 12 वर्षे या भागात राहत असून, महानगरपालिका प्रशासनाला मालमत्ता कर आणि इतर ठरविलेले कर वेळच्या वेळी भरतो आहोत. असे असूनही आम्हाला आमच्या भागात प्राथमिक सोयी सुविधाही प्रशासन देत नसल्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे मत स्थानिक रहिवासी भरत भंडारी यांनी सांगितले.

रस्त्याच्या खराब अस्वस्थेमुळे ओला, उबर आणि रिक्षाचालक इथली भाडी घेण्याचे नाकारतात, उघड्या गटारांमुळे डासांचा भयंकर त्रास रहिवाशांना वर्षानुवर्षे सोसावा लागतो आहे. लाखो रुपये खर्चून घर खरेदी होते मात्र आजूबाजूच्या बकाल वातावरणामुळे इथले वास्तव्य स्वप्नपूर्ती न वाटता कित्येक रहिवाशांसाठी एक दु:स्वप्न बनले आहे. केडीएमटीची बस सेवाही या भागात नाही. म्हणुनच रस्ते, गटारे आणि स्वच्छता या आमच्या प्रमुख व पायभूत मागण्या आहेत अशी माहिती प्रशांत टोळे यांनी दिली.

परिसरातील समस्यांविषयी सर्वच संस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, मात्र प्रशासन लक्ष देत नाही. आता पालिकेने लेखी आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या मोघम आश्वासनांवर परिसरातील नागरिकांना आता विश्वास नसून सर्व नागरिकांनी महापालिकेकडे टाईम बाउंड अॅक्शन प्लॅन / काल बद्ध कृतीशील आराखडा देण्याची मागणी केलेली आहे. तसे न झाल्यास हे आंदोलन विविध मार्गांनी सुरूच ठेवण्याचा येथील नागरिकांचा निर्धार असल्याचे मत स्थानिक रहिवासी रसिका जोशी यांनी व्यक्त केले.

loading image
go to top