
Dombivali Crime : परप्रांतीय फेरीवाल्याची पुन्हा एकदा नागरिकाला मारहाण
डोंबिवली - डोंबिवली स्टेशन परिसरात फेरिवाल्यांची मुजोरी वाढत असून किरकोळ कारणांवरुन सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. मार्च महिन्यात रुग्णवाहिका चालकाला फेरिवाल्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर मनसेने आक्रमक होत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा अशी मागणी केली. पालिका प्रशासनाने ही बाब मनावर घेत स्टेशन परिसरातील फेरिवाले हटविले. मात्र ही मोहीम थंडावताच पुन्हा स्टेशन परिसरात फेरिवाले सक्रीय झाले आहेत.
मंगळवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद होत तीन ते चार फेरिवाल्यांनी मुंबई महापालिका कर्मचारी नरेश चव्हाण याला लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा रामनगर पोलिसांनी दोन फेरिवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फेरिवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
डोंबिवलीतील नेहरु रोड परिसरात नरेश चव्हाण हे कुटूंबासह राहतात. मंगळवारी सायंकाळी ते कामावर जाण्यासाठी निघाले होते. डोंबिवली स्टेशन परिसरातील मधुबन टॉकीज गल्ली ही पूर्णतः फेरिवाल्यांनी वेढली आहे. येथून जात असताना त्यांचा पाय एका फेरिवाल्याच्या सामानाला लागला. यावरुन त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रुपांतर पुढे वादात होऊन फेरिवाल्याने नरेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
नरेश यांनी देखील फेरिवाल्याला मारहाण केली, मात्र तेवढ्यात इतर आजूबाजूचे फेरिवाले देखील येऊन तीन ते चार जणांना नरेश यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. नरेश यांच्या उजव्या खांदयावर, नाकाला, छातीवर ,पाठीवर मारहाण केली गेली आहे. या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात रामआश्रय वर्मा (वय 23) आणि श्रीपाल रामआश्रय वर्मा (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन सिनेमा गल्ली ही आपल्या मालकीची आहे अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले हे या भागात वावरत असतात. या जागेचे आम्ही भाडे देतो असे उघड सांगत दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनेक वर्षापासून परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सुरु आहे.
नागरिकांनी फेरीवाल्यांना बाजुला बसण्यास सांगितले की फेरीवाले संघटितपणे कर्मचारी किंवा नागरिकाला घेरुन त्याच्याशी उध्दट वर्तन करत असल्याचे प्रकार वाढले आहे असून असाच प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. मार्च महिन्यात देखील अशाच किरकोळ कारणावरुन रुग्णवाहिका चालक गणेश माळी याला दोघा फेरिवाल्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर मनसेचे आक्रमक पवित्रा घेत स्टेशन परिसर फेरिवाला मुक्त करा यासाठी रस्त्यावर उतरले.
पालिका प्रशासनाने त्याची दखल घेत स्टेशन परिसरातून फेरिवाले हटविले. पालिका प्रशासनाने फेरिवाल्यांचा जागेचा तिढा सुटेपर्यंत त्यांना तेथे बसण्यास परवानगी देण्यात येईल असे सांगताच पुन्हा या भागात फेरिवाल्यांनी आपले बस्तान मांडले. मात्र त्यांची दादागिरी वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.