Mahesh Gaikwad : भाजपचे हे संस्कार नाहीत; मला पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल

गोरगरीबांसाठी अशा अनेक गोळ्या झेलायला तयार; शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड
Mahesh Gaikwad
Mahesh Gaikwadsakal

डोंबिवली - आमदार गणपत गायकवाड हे मुळात भाजपचे कार्यकर्ते नाहीत. केवळ मतांसाठी ते भाजपमधून लढले. मला माहित आहे भाजपचे हे संस्कार नाहीत भाजप पक्ष हा सर्वसामान्यांचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे.

संविधानात्मक ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मला न्याय मिळेल असे विधान शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण येथे केले. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळी मारल्याने जखमी झालेले महेश हे आज बरे होऊन रुग्णालयातून घरी पोहोचले.

कल्याण येथे पत्रकार परिषद घेत आपल्यावर झालेल्या हल्ल्याविषयी त्यांनी मला न्याय मिळेल असे म्हणत गोरगरीबांसाठी अशा अनेक गोळ्या झेलायला तयार असल्याचे सांगितले.

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या. यात महेश यांच्यासह राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 फेब्रुवारीला ही घटना घडली होती.

त्यानंतर 15 फेब्रुवारीला महेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याने कल्याण मध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. मात्र प्रकृती फारसी ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले नाही. अखेर सोमवारी महेश यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आपल्या लहान मुलासह त्यांना आणण्यासाठी गेल्या होत्या.

महेश हे बाहेर पडताच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली. आपल्या मुलाला व लहान मुलीला देखील त्यांनी जवळ घेतले. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते. असे त्यांनी करायला नको होते. गणपत गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया महेश यांच्या पत्नीने व्यक्त केली.

महेश यांचे कल्याण येथे दुर्गाडी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी पारनाका येथील स्वामींच्या मठात जाऊन त्यांनी दर्शन घेतले, नंतर ग्रामदैवत तिसाई देवीचे दर्शन घेतले.

महेश गायकवाड हे त्यांच्या कार्यालयाजवळ येताच ढोल ताशांचा गजर, बेंजोच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. त्यांना उचलून घेत नाचले. आमचा वाघ आला अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले.

यानंतर महेश गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. भाजपाचे मुळात ते कार्यकर्ते नाहीत. संधी साधून ते 2019 ला मतांसाठी भाजपमधून लढले. मला माहितीये भाजपचे हे संस्कार नाहीत. भाजप पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीसांवर यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर हल्ला झाला ते ठिकाण संविधानात्मक आहे. अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही.

गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण पूर्वचे आमदारांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नव्हता. रस्ते, स्मशानभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असो. मी सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्याचं काम सातत्याने करत होतो. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे त्यासाठी आग्रह धरत होतो. कल्याण पूर्वेत रस्ते, गटार, नाले, पूरजन्य परिस्थिती असो मी सातत्याने काम करतो.

हे काम करताना मला आमदार गायकवाड यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, रवींद्र चव्हाण यांना मी याविषयी सांगितले होते. मुख्यमंत्री शिंदे यांना देखील सांगितले होते. त्यावर त्यांनी आपण युती मध्ये आहोत ऍडजेस्टमेंट करावी लागेल असे म्हणत माझी समजूत काढली होती. आमदार गायकवाड मला प्रतिस्पर्धी समजत होते पण मी नाही.

मला विभागाची दशा बघवत नव्हती म्हणून मी काम करत होतो. मी गोर गरीब जनतेसाठी लढलो त्यांच्यासाठी गोळ्या झेलल्या याचा मला अभिमान आहे. कल्याण पूर्व येथील विकास असो किंवा येथील नागरिकांच्या समस्या असतो त्या सोडवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील, अशा अनेक गोळ्या झेलेले असे सांगितले.

नेमकं प्रकरण काय झाले याविषयी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांचे पैसे देण्यास बिल्डर आग्रही होते. मात्र आमदार गायकवाड हे स्वतः पैसे देतो असा प्रयत्न करत होते. शेतकरी गोरगरीब असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी धावून गेल्यावर माझी ही अवस्था झाली. तर सर्वसामान्यांच्या बाबतीत आमदार गायकवाड कसा क्रूरपणा दाखवतील हे आपण पाहिलं आहे.

येणाऱ्या काळात न्यायालयीन लढाई लढेल मला न्याय मिळेल. माझा परिवार आज उघड्यावर पडला असता. परंतु तुम्हा लोकांच्या प्रार्थना, आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने, खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नाने मी सर्वांसमोर आहे असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com