डोंबिवली : एकहाती सत्तेसाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

डोंबिवली : एकहाती सत्तेसाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरू

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महागरपालिका निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून प्रभागांची संख्या ही 122 वरून 133 होत आहे. प्रभागांची वाढती संख्या लक्षात पाहता कल्याण डोंबिवलीत एकहाती सत्ता आणण्यासाठी साधारण 70 च्या पुढे सेनेचे नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. कल्याण व कल्याण ग्रामीण भागात सेनेचे वर्चस्व असले तरी तेथे मनसे आणि भाजपाची देखील फळी आहे. डोंबिवली हा तर भाजपाचा बालेकिल्ला आहे. हे लक्षात घेऊन सेनेने मनसे - भाजपाचे प्राबल्य असलेल्या भागातील नगरसेवकांशी जुळवाजुळव सुरू केली आहे. मनसे, भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी - काँग्रेसमधून भाजपात गेलेल्यां नाही सेना गळाला लावत आहे. दिवाळीच्या बहाण्याने आजही सेना नेते अनेकांची भेट घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत भाजपाने इतर पक्षांचे नगरसेवक फोडून त्यांचा भाजपात प्रवेश करून आपले पक्षिय बलाबल वाढविले होते. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. त्यातच यंदा प्रथमच पालिकेच्या पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व एकहाती सत्तेसाठी शिवसेनेने आता सर्व पक्षांना लक्ष करीत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. मनसे पक्षातील महत्वाचा

चेहरा, पक्षाचा आवाज म्हणून वेगळी ओळख असणारे मनसे प्रदेशाध्यक्ष राजेश कदम यांनी फेब्रुवारी महिन्यात सेनेत प्रवेश केला. मनसेच्या स्थापनेपासून पक्षात असलेले, शिवसेना सोडून पक्षात आलेले कदम यांच्या जाण्याने पक्षाची काही प्रमाणात हानी झाली आहे.

यानंतर आता सेनेने भाजपाचे महेश पाटील यांचा सोमवारी पक्षप्रवेश करून घेतला. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांचे पाटील हे अत्यंत जवळचे मानले जातात. मात्र मध्यंतरी पक्षातील पदाधिकारी आणि पाटील यांच्यात बेबनाव झाला. महेश पाटील यांना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा न दिल्याने ते नाराज झाले होते. तेव्हाच ते सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. कोरोनामुळे त्यांचा पक्ष प्रवेश लांबला होता. महेश पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे भाऊ चौधरी हे उभे होते. भाऊ यांचा अगदी थोड्या फरकाने पराभव झाला होता. निवडून आल्यावर महेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण मध्ये आपला चांगला वचक निर्माण केला आहे. ज्याचा फायदा आता सेनेला होऊ शकतो.

याबरोबरच 2015 ला राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले , नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक सेनेच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा: विश्वजित कदम यांची मतदारांसह केंद्राला भेट; पाहा व्हिडीओ

आगामी कल्याण डोंबिवली ची निवडणूक लक्षात घेता शिवसेनेला एकहाती सत्ता आणण्यासाठी साधारण 70 च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणे आवश्यक आहे. डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाला शह देण्यासाठी आमदारांचे निकटवर्तीय समजले जाणारे पाटील यांनाच सेनेने फोडले आहे. त्यांच्यामार्फत आता आणखी काही नगरसेवकांची मनधरणी सेना करणार आहे. भाजपा विरोधी पक्ष म्हणूम सक्रिय होत असताना मनसे बॅकफूट वर जात असल्याचे दिसते. मनसेतील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात सेना आहे.

हेही वाचा: ''मला शुभेच्छांपेक्षा सध्या कामाची गरज आहे''

दिवाळीत खास फराळाच्या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसे, भाजपा, काँग्रेस मधील अनेकांची भेट घेतली असून आता कोण कोण सेनेच्या गळाला लागते हे स्पष्ट होईलच.

कल्याण डोंबिवली तील पक्षिय बलाबल

शिवसेना - 53

भाजपा - 43

मनसे - 9

राष्ट्रवादी - 2

काँग्रेस - 4

अपक्ष - 9

एमआयएम - 1

बहुजन समाज - 1

loading image
go to top