जेल मधून सुटल्यानंतर तिघांची पुन्हा चोरी; दोघांना केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

Dombivali Crime : जेल मधून सुटल्यानंतर तिघांची पुन्हा चोरी; दोघांना केली अटक

डोंबिवली - कल्याण मधील फिल्पकार्डच्या गोडाऊनमधून चोरी करुन चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवली. गोडाऊन मधून चोरी झालेल्या मोबाईल पैकी एक मोबाईल अॅक्टिव्हेट झाला आणि त्या आधारे जालना येथून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे तपास करत आणखी दोघा साथीदारांची माहिती काढत त्यांना अटक केली आहे. जेलमध्ये या तिघा आरोपींची ओळख झाली होती. जेलमधून बाहेर पडल्यानंतर तिघांनी मिळून चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील एका फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. तीन अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूस असलेले ग्रिल उचकटून गोडाऊन मध्ये डिलिव्हरी साठी ठेवलेले महागडे साहित्य असा जवळपास सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोडाऊन मधील सीसीटीव्ही मध्ये ही चोरीची घटना कैद झाली होती.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे व पगारे यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे वेगवेगळ्या शहरात पसार झाले होते. पोलिसांचा सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास सुरू असताना गोडाऊन मधून चोरी गेलेल्या मोबाईल मधून एक मोबाईल सुरू झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी या मोबाईलचा माग काढला असता हा मोबाईल जालना मध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ जालना गाठून तेथून राहुल पंडित या चोरट्याला बेड्या ठोकल्या. राहुलने चौकशी दरम्यान सागर शिंदे व अमन खान या त्याच्या दोन साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी सागर शिंदे याला उल्हासनगर येथून अटक केली. या दरम्यान अमर खान मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.

राहुल पंडित, सागर शिंदे व अमन खान या तिघांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर हे तिघे पुन्हा एकत्र भेटले. आणि त्यांनी चोरी करण्याचा प्लॅन आखला. ही चोरी करण्यासाठी राहुल पंडित यांनी नेरूळ येथून एक रिक्षा देखील चोरी केली. याच रिक्षात सागर पंडित व अमन खान बसले व या तिघांनी हे गोडाऊन फोडले होते.

दरम्यान हे तिघे सराईत गुन्हेगार असून या तिघांविरोधात कोळसेवाडी, महात्मा फुले चौक, उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, भिवंडी मधील नारपोली पोलीस स्टेशन व भिवंडी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.