डोंबिवली : रुग्णालयातील सुविधा, यंत्रणांची जबाबदारी कोणाची आय एम ए सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : रुग्णालयातील सुविधा, यंत्रणांची जबाबदारी कोणाची आय एम ए सवाल

डोंबिवली : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे. मात्र या अपघातासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांना दोषी धरून त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकणे ही शरमेची बाब आहे. केवळ तेच या घटनेस जबाबदार असल्याचे जे चित्र रंगविले जात आहे त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध असून यातील दोषींना न्यायालयाने शिक्षा करून योग्य न्याय द्यावा. तसेच वारंवार अशा घटनांमध्ये डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी बनविले जाते, मात्र इतर यंत्रणांची जबाबदारी काय? शासन यासाठी गांभिर्याने काही प्रयत्न करणार की नाही? असा सवाल आयएमएने उपस्थित केला आहे.

नगर येथील दुर्घटनेस केवळ डॉक्टर, परिचारिका हे जबाबदार असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे त्यास आयएमएने विरोध दर्शविला आहे. डॉक्टर आणि परिचारिका हे रुग्णांचे उपचार आणि शुश्रुषा यास जबाबदार असतात. रुग्णालयातील सुविधा, त्यांची काळजी, यंत्रांची निर्दोष तपासणी आणि काळजी या गोष्टींना कोण जबाब असतात असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. खाजगी रुग्णालयास आग लागून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे कारण देत त्यांच्या मालकावर कायदेशीर कारवाई केली जाते, त्याच न्यायाने शासकीय रुग्णालयाचे मालक असलेल्या लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात येऊ नये का? आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई का होते?

हेही वाचा: सिद्धूंच्या राजीनाम्यावर पंजाबचे नवे मुख्यमंत्री चन्नी म्हणतात, "मला त्यांच्यावर..."

राज्यातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, दवाखाने यांचे गेल्या काही वर्षात अग्निशमन यंत्रणांचे परीक्षण झाले आहे का?, त्यात आढळलेल्या त्रुटींचीपूर्तता केली गेली का? खाजगी रुग्णालयास ज्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी अधिकृत संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देणे बंधनकारक आहे, तसे शासकीय रुग्णालय आणि दवाखाने यांना का नाही? खाजगी रुग्णालयास ज्याप्रमाणे अनेक नियम, कायदे लागू आहेत, तसेच नियम, कायदे शासकीय रुग्णालय व दवाखाने यांना का लागू करण्यात येऊ नये? यांसारखे अनेक प्रश्न असोसिएशनने उपस्थित केले असून सदर कारवाई ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे. अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी शासन गांभीर्याने काही प्रयत्न करणार आहे की नाही? अपघात आणि सहेतुक केलेली इजा यात शासन काही फरक करणार की नाही? असा खडा सवाल असोसिएशनने शासनाला केला आहे.

हेही वाचा: भीक मागणाऱ्या मुलीवर शेकडो जणांनी केला बलात्कार; पाहा व्हिडिओ

आग लागली ही घटना दुर्दैवी नक्कीच आहे. मात्र ती मागू नये म्हणून उपाययोजना करणे व त्या अमलात आणणे ही जबाबदारी कोणाची आहे की नाही? केवळ डॉक्टरांना यात दोषी धरणे योग्य नाही असे आयएमएचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले.

नगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्याविषयी आयएमएने शोक प्रस्ताव पारित केला आहे. या घटनेस 3 परिचारिका व एक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यासंबंधी न्यायालयाने लवकर निर्णय घेऊन योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी आहे. अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे व सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- सुहास पिंगळे, नियोजित अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट

loading image
go to top