डोंबिवली पासपोर्ट सेवा कार्यालयावरुन सेना भाजपमध्ये चढाओढ

सुचिता करमरकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

डोंबिवली - पोस्ट ऑफीसमधे पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याचे कारण देत हे कार्यालय कल्याण पश्चिममध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. डॉ शिंदे यांनी पासपोर्ट सेवा कार्यालय डोंबिवलीत आणण्यात यश मिळवले खरे परंतु, यात सेना भाजप मधील चढाओढ असल्याची चर्चा जोरात आहे. 

डोंबिवली शहर तसेच परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेत या भागात पासपोर्ट कार्यालयाची गरज असल्याचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार डोंबिवली, नवी मुंबई या भागात पासपोर्ट सेवा कार्यालयांची घोषणा करण्यात आली. मात्र डोंबिवलीत या कार्यालयासाठी पुरेशी जागा नसल्याचे कारण देत ठाण्यातील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हे कार्यालय कल्याण पश्चिममध्ये असावे असे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत हे कार्यालय डोंबिवली मधील औद्योगिक विकास महामंडळ परिसरात आणण्यात शिंदे यांना यश मिळवले आहे. 

कल्याण येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. डोंबिवलीतच हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु व्हावे यासाठी एमआयडीसी निवासी विभागातील पोस्ट ऑफिसची जागा पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. शिंदे यांनी ठाणे विभागीय अधिक्षकांबरोबर चर्चा केल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्र एसआयडीसी निवासी विभागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विभागीय कार्यालयात पाठवण्यात आला आहे. डॉ श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भेट घेतली. अवघ्या एका वर्षावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघात काम झाल्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि सेनेत चढाओढ असल्याची कुजबुज या निमित्ताने सुरु झाली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. हे कार्यालय डॉ शिंदे यांच्या मतदारसंघाबाहेर हलवण्याच्या सूचना अधिकाऱ्यानी कशा दिल्या? कोणाच्या दबावाने हा पत्र व्यवहार झाला का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Web Title: Dombivli passport service office BJP shivsena