कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका! का ते समजण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी

file photo
file photo

ठाणे : येत्या प्रजासत्ताक दिनी डोंबिवलीतील "नो हॉर्न डे' उपक्रमात वाहतूक पोलिसांनीही आपला पाठिंबा दर्शविला असून विनाकारण हॉर्न वाजविल्याने होणारे दुष्परिणाम आणि त्याविषयीचे नियम वाहनचालकांना समजावून सांगण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

वाहनांमधून निघणारा धूर आणि वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. शहरात गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या वाहनांच्या कोंडीने हॉर्न वाजवण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अनेक अडथळे येत असतात.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची सतत वर्दळ सुरूच असते. डोंबिवलीतील घरडा सर्कल, फडके रोड, चार रस्ता, बाजीप्रभू चौक, स्टेशन परिसर, पश्‍चिमेला सम्राट चौक, सुभाष रोड, स्टेशन परिसर, गांधी रोड, फुले रोड या रस्त्यांवर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या ठिकाणी वाहनचालक जोरात हॉर्न वाजवतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्‍य होत नाही. तसेच वाहतूक कोंडीत एकाच वेळी अनेक वाहनचालक जोरात हॉर्न वाजवत असल्याने त्या वेळी वाहतुकीवर नियंण ठेवायचे की नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायची, अशी मोठी कसरत वाहतूक पोलिसांची होते.

शांतता क्षेत्र, निवासी विभाग, औद्योगिक विभाग, रहिवासी विभाग आदी सर्वच ठिकाणी ध्वनिमर्यादा क्षमतेपेक्षा जास्त असल्याचा अहवाल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरात केवळ 19 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

येत्या 26 जानेवारीला डोंबिवलीत "नो हॉर्न डे' हा उपक्रम राबविला जाणार आहे. याविषयी वाहतूक पोलिसांसोबत चर्चा केली असता या उपक्रमाला आमचाही पाठिंबा असेल. अनेक वाहनचालक विनाकारण कर्णकर्कश हॉर्न वाजवत असतात. मुळात हॉर्न वाजवूच नये, त्यातही वाहनाला जो हॉर्न कंपनीने दिलेला असतो त्यात बदल केला जाऊ नये. यात अनेक जण बदल करून वेगवेगळ्या आवाजाचे हॉर्न बसवितात. हॉर्न वाजवूच नका, असे आमचेही म्हणणे असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 


विनाकारण वाहनचालकांनी हॉर्न वाजवूच नये. अपघात टाळण्यासाठी हॉर्नची गरज असते, तेवढ्यापुरताच तो वाजवावा. सतत कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने रस्त्यावरील अन्य वाहनचालकांचे लक्ष विचलित होते, पादचाऱ्यांना एकदम दचकल्याचा भास होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. "नो हॉर्न डे' उपक्रमाला आमचाही पाठिंबा असेल, वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला यामुळे आळा बसण्यास मदत होईल. 
- सतेज जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, डोंबिवली. 

ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा 
ठिकाणाचे स्वरूप कालमर्यादा दिवसा कालमर्यादा रात्री 
(सकाळी 6 ते रात्री 10) (डेसिबल) (रात्री 10 ते सकाळी 6) (डेसिबल) 
औद्योगिक केंद्र 75 70 
व्यापारी केंद्र 65 55 
रहिवासी क्षेत्र 55 45 
शांतता क्षेत्र 50 40 


कायदा काय सांगतो. 
वाहनांमध्ये वेगवेगळ्या आवाजाचे, कर्णकर्कश हॉर्न बसविल्यास व ते वाजविल्यास कायद्यान्वये 500 रुपये दंड आकारण्यात येतो. 
अनावश्‍यक, शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविल्यास कायद्यान्वये 200 रुपये दंड आकारण्यात येतो. 

कारवाई केलेल्या वाहनांची संख्या गुन्हे दंडवसुली 
विनाकारण हॉर्न वाजविणे 11 1800 
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे 8 4600 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com