डॉ. भक्ती मेहरला अखेर अटक

Crime
Crime

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महानगरपालिकेनेही या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. डॉ. पायल कार्यरत असलेल्या नायर रुग्णालयात प्रसूतिरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. यी. चिंग लिंग यांचा जबाब पोलिसांनी मंगळवारी नोंदवला आहे.

या प्रकरणात रुग्णालयातून पळून गेलेल्या तीन आरोपींपैकी डॉ. मेहरला आज पोलिसांनी अटक केली, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. तिला बुधवारी शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर डॉ. हेमा आणि डॉ. अंकिता अद्याप पोलिसांच्या हाती लागलेल्या नसून, त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान, तसेच ऍट्रॉसिटी कलम लागू करण्यात आले आहे. ते या प्रकरणात लागू होत नाही. तसेच काम सांगणे ही छळवळणूक होत नाही असा दावा या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. ऍट्रॉसिटी, रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करत या प्रकरणी राज्य महिला आयोगाने या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. पायल तडवीला वेळीच उपचार मिळाले असते, तर तिचा जीव वाचवता आला असता. तसेच तिची आत्महत्या संशयास्पद असून, पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न झाले आहेत, असा खळबळजनक आरोप आज डॉ. सलमान तडवी यांनी केला.

संघटनांचे आंदोलन
डॉ. पायलच्या आत्महत्येला आठवडा होत आला तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने विविध विद्यार्थी संघटना, तसेच राजकीय पक्षांनी आज आंदोलन केले. डॉ. पायलचे पती डॉ. सलमान, आई ए. एस. तडवी, वडील तसेच इतर नातेवाइकांनी आंदोलन केले. त्या वेळी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष नायर रुग्णालयाला भेट देऊन तिच्या नातेवाइकांसोबत तसेच आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय डॉ. सलमान यांनी व्यक्त केला. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही या तिघांनी चोरली असावी, असा प्रमुख आरोप त्यांनी केला.

डॉ. पायल यांच्या आत्महत्येच्या दिवशीचा घटनाक्रम
(तिचे पती डॉ. सलमान यांनी सांगितल्यानुसार)

- दिवसभरातील दोन शस्त्रक्रियेत डॉ. पायल यांनी भाग घेतला. मात्र तिला तिन्ही आरोपींकडून अपमानास्पद वागणूक दिली गेली
- अपमानास्पद वागणुकीची माहिती डॉ. पायल यांनी चार वाजता आईला फोनद्वारे दिली.
- सहा वाजता डॉ. पायल विभागातील रुग्णांना पाहण्यासाठी ड्यूटीवर जाणे अपेक्षित होते. परंतु त्या ड्यूटीवर न आल्याने तिन्ही आरोपी तिच्या रूमवर गेल्या. रूम बंद असल्याने त्यांनी हाका मारल्या. साडेसहा वाजता दरवाजा बाहेरून उघडण्यात आल्यानंतर पायल यांनी गळफास लावल्याचे लक्षात आले.
- साडेसात वाजता पायलचे पती डॉ. सलमान तडवी रुग्णालयात आले. त्यांनी स्वतः सीपीआर उपचारांतून पायल यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री नऊ वाजता पायलला मृत घोषित करण्यात आले.

उच्च न्यायालयात याचिका
या प्रकरणात ऍड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. त्यात, ही हत्या असून डॉ. पायल यांच्या शरीरावर मारहाणीचे वळ असल्याचा दावा केला आहे. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी. त्याचबरोबर तिच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com