डॉ. घाणेकर नाट्यगृहाचे पोकळ वासे! 

डॉ. घाणेकर नाट्यगृहाचे पोकळ वासे! 

ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला सोसावा लागत आहे. दुरून अतिभव्य, अत्याधुनिक दिसणाऱ्या या नाट्यगृहाचे वासे हळूहळू पोकळ ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

ठाणेकरांना गडकरी रंगायतनव्यतिरिक्‍त आणखी एक नाट्यगृह उपलब्ध व्हावे म्हणून घोडबंदर रोड येथील हिरानंदानी मेडोज भागात डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आले. डिसेंबर 2011 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नाट्यगृहाचे लोकार्पण केले. बांधकामाला काही वर्षे उलटत नाहीत, तोच एप्रिल 2016 मध्ये येथील मिनी थिएटरचे सीलिंग कोसळले. त्या घटनेतून नाट्यगृह किती तकलादू आहे, याची प्रचीती आली. मात्र बांधकाम व्यावसायिकानेही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हात वर केल्यामुळे या नव्या कोऱ्या वास्तूची दुरुस्ती महापालिकेला करावी लागत आहे. 2016 पासून मिनी थिएटर बंद असल्याने विद्युतसंच मांडणी, विद्युतकामे, ध्वनिक्षेपण यंत्रणा, मध्यवर्ती वातानूकुलित यंत्रणा; तसेच नाट्यगृहातील देखभाल-दुरुस्ती असा एकूण 67 लाख 42 हजार 938 रुपये इतका खर्च झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रसाद भंदिगरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती पुढे आली आहे. येथील मिनी थिएटर बंद झाल्याने या ठिकाणी प्रायोगिक नाटके किंवा शालेय कार्यक्रम होऊ शकले नाहीत. याचा नाट्यगृहाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. 

दीड वर्षापासून नाट्यगृह बंद असल्याने कलारसिकांना नाटकांसाठी मुकावे लागले. त्यामुळे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात रसिकांना, कलाकारांना गडकरी रंगायतनवर विसंबून राहावे लागले. 
- प्रदीप भंदिगरे, अध्यक्ष, ओवळा-माजिवडा विधानसभा सांस्कृतिक विभाग 

ज्या वेळी या नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होते, त्या वेळी प्रशासनाने लक्ष देऊन बांधकाम करून घेतले असते, तर ही वेळ आली नसती. आम्हीदेखील यापूर्वी बांधकामातील अनेक त्रुटी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. 
- विजू माने, चित्रपट दिग्दर्शक 

नाट्यगृहाचे उत्पन्न 
वर्ष उत्पन्न 
2016 1 कोटी 23 लाख 33 हजार 663 रुपये 
2017 70 लाख 4 हजार 162 रुपये 
2018 88 लाख 92 हजार 061 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com