डॉ. लहानेंच्या मदतीमुळेच छगन भुजबळ तुरुंगाबाहेर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहार आणि "मनी लॉंडरिंग'प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉंबे हॉस्पिटलमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिफारशीमुळे दाखल करण्यात आले होते. या मुक्कामात त्यांना "व्हीआयपी ट्रीटमेंट' दिल्याप्रकरणी विशेष अंमलबजावणी संचालनालय (ईडी) न्यायालयाने डॉ. लहाने यांना दोषी ठरवले आहे. अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर "ईडी' न्यायालयाने हा निकाल दिला.

छातीत दुखत असल्याने भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयातून बॉंबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल 35पेक्षा जास्त दिवस भुजबळ यांचा तिथे मुक्काम होता. भुजबळ तिथे आरामात राहत आहेत, त्यांना राजकारणाशी संबंधित अनेक गुन्हेगार भेटत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला होता. विशेष म्हणजे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. लहाने यांच्या आशीर्वादानेच भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयातील कैदी वॉर्डमधून उपचार आणि वैद्यकीय चाचण्यांच्या बहाण्याने बॉंबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे दमानिया यांचे म्हणणे होते.

डॉ. लहाने यांनी मात्र आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. न्यायालयाला हा युक्तिवाद पटला नाही. लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ तुरुंगाबाहेर असल्याचा ठपका "ईडी' न्यायालयाने ठेवला आहे. लहाने यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे.

प्रकरण उच्च न्यायालयाकडे
ईडी न्यायालय न्यायालयाच्या अवमान प्रकरणावर सुनावणी घेऊ शकत नसल्याने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालयच निकाल देईल, असेही विशेष "ईडी' न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: DR. Lahane help to chagan Bhujbal prison