डॉ. मुणगेकर यांचा टास्क फोर्स मध्ये काम करण्यास नकार; निवड करताना शासकीय संकेत न पाळल्याबद्दल नाराजी

तेजस वाघमारे
Monday, 28 September 2020

माझी निवड करताना शासकीय संकेत पाळले गेले नसल्याचे मत नोंदवत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीत काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत त्यांनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या समितीमध्ये माझी निवड करताना शासकीय संकेत पाळले गेले नसल्याचे मत नोंदवत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीत काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत त्यांनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल 

डॉ. मुणगेकर यांनी उदय सामंत यांना पाठवलेले पत्र सकाळच्या हाती आहे आहे. या पत्रात मुणगेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या समितीमध्ये माझी नियुक्ती केल्याबद्दल मी धन्यवाद देतो; परंतु यासंदर्भात एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असल्याचे मला वाटते. मुंबई विद्यापीठाचा माजी कुलगुरू, योजना आयोगाचा माजी सदस्य, राज्य सभेचा माजी सदस्य आणि भारतीय उच्च अध्ययन संस्थेचा (सहा वर्षे) माजी अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे सार्वजनिक, राजकीय आणि शासकीय पातळीवर जे संकेत पाळावयाचे असतात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. सदर समिती स्थापन करताना हे संकेत पाळले गेले नसल्याचे मला खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. त्यामुळे या समितीवर सदस्य म्हणून काम करणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीशी विसंगत असल्यामुळे मी काम करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. शिक्षण क्षेत्राशी गेली 40 वर्षे संबंध आल्यामुळे समितीला माझ्याशी विचार विनिमय करावासा वाटला, तर मी कधीही उपलब्ध असेन, असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

या समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, मराठवाडा वाणिज्य कॉलेजचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अजिंक्य पाटील, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन कॉलेजचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. अजित जोशी आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांचा समावेश आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Mungekar refuses to work in task force