डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण; नायरच्या अधिष्ठातांच्या निलंबनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

रॅगिंगप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे आरोप करत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या निलंबनाची मागणी होत आहे.

मुंबई : रॅगिंगप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे आरोप करत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या निलंबनाची मागणी होत आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या प्रकरणी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. 

डॉ पायल तडवीचा कमी लेखणे, अतिरिक्त काम देणे या घटना केवळ रॅगिंग म्हणून पाहता कामा नये. या संपूर्ण प्रकरणाला ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे चालवायला हवे. या प्रकरणात नायर रुग्णालयाचे दुर्लक्ष हे गुन्हेगारी स्वरुपाचे आहे, असा आरोप डॉ मुणगेकर यांनी केला.

डॉ पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी गायनोलोजी विभागप्रमुख, अधिष्ठाता हे सर्वच आरोपींएवढेच दोषी आहेत. त्यांच्यामुळे आरोपींची हिंमत वाढली, असा आरोपही त्यांनी केला. रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असताना आरोपी कसे पळून जातात, असा प्रश्नही त्यांनी विचारला. डॉ पायल तडवीची हत्या ही जातीयवादी हत्या आहे, या शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली.

अधिष्ठाता भारमल यांनी तडवी कुटुंबीयांची लेखी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. अधिष्ठांतांनी अगोदरच या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर आज डॉ पायल तडवी जिवंत असती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कुटुंबप्रमुख या नात्याने अधिष्ठातांवर संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पडण्यात अधिष्ठाता कमी पडले, अशी टीकाही वाघ यांनी केली. अधिष्ठाता डॉ रमेश भारमल यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Tadvi Suicide Case Suspend to Dean of Nair Hospital Demanding