कळंबोलीत खड्ड्यांचे विघ्न 

सकाळ वृत्‍तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची दुरवस्था; गणेशभक्‍तांकडून तीव्र नाराजी

नवीन पनवेल : कळंबोली वसाहतीत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग खड्ड्यात गेला आहे. तरीसुद्धा सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्याने कळंबोलीमधील गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुसळधार पावसामुळे सेक्‍टर- १४ व इतर ठिकाणचे रस्तेच हरवले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कळंबोलीत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्याही मोठी आहे, असे असताना वसाहतीतील बाप्पांचे आगमन खड्ड्यातून झाले. दीड दिवसाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक खडतर मार्गावरून झाली. परंतु सिडकोला याबाबत जाग आली नाही. किमान दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देताना विसर्जन मार्ग तात्पुरता तरी दुरुस्त करावा, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली आहे.

रस्त्यावर सांडपाणी
वसाहतीतील बहुतांशी गणपती विसर्जन मिरवणूक एसबीआय चौकातून जातात. या परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची गळती होत आहे. चेंबरमधून पाणी वाहत असल्याने हा रस्ता एकप्रकारे सांडपाण्यात हरवला आहे. त्यातच खड्डेच खड्डे असल्याने मिरवणुकीचा मार्ग बदलावा की काय, असा प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाने उघडीप दिल्यास एका दिवसाच्या आत विसर्जन मार्गातील व वसाहतीमधील सर्व खड्डे पाच दिवसांच्या गणपती विसर्जनापूर्वी बुजवले जातील. 
- सीताराम रोकडे, अधीक्षक अभियंता, सिडको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage of pits in Kalamboli