अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार

कृष्ण जोशी
Saturday, 5 September 2020

युवराजांचा अहंकार जपण्यासाठी अंतिम वर्षाच्या थातुरमातुर परिक्षा घेण्याचे नाटक होत आहे. शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग सुरु आहे. हा सारा प्रकार चटावरचे श्राद्ध उरकण्यासारखा आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई : युवराजांचा अहंकार जपण्यासाठी अंतिम वर्षाच्या थातुरमातुर परिक्षा घेण्याचे नाटक होत आहे. शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग सुरु आहे. हा सारा प्रकार चटावरचे श्राद्ध उरकण्यासारखा आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? खारघरमधील वसतिगृह लवकरच सुरू करणार; अदिती तटकरेंचे आश्वासन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने नाइलाजाने घेतला. परंतु हा निर्णय बेकायदा प्रकारे घेतला आहे. परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  हे मागे कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले. आता त्यांनी कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईत उन्ह्याच्या झळा; तापमान 34 अंशाजवळ, जाणून घ्या येत्या दोन दिवसात कसं असेल तापमान

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरिता बोलावलेल्या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या अहवालातील शिफारसी माध्यमांसमोर जाहीर केल्या. यात घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या शिफारशींचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली असून, कुलगुरूंना देण्यात आलेल्या पत्रांमध्येसुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपालांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची तक्रार केली आहे, असे भातखळकर म्हणाले. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावरच परीक्षा व्हाव्यात अशी मागणी सुद्धा आपण राज्यपालांकडे केल्याचेही ते म्हणाले.
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drama to take exams in the state! BJP MLA Atul Bhatkhalkar's complaint to the Governor