
पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेले वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
खारघर : पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेले वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
रायगड जिल्ह्यात आकर्षक पर्यटनस्थळे आहेत. खारघरमधील पांडवकडा धबधबा, इस्कॉन मंदिर, सेंट्रल पार्क आदी पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अल्प दरात वसतिगृहामध्ये निवास करता यावा यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाने खारघर सेक्टर 12 येथे ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलशेजारी प्लॉट न. 10 येथील राखीव भूखंडावर चार मजली वसतिगृह उभारले आहे. वसतिगृहात 29 खोल्या, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, ग्रंथालय, वाचनालय आदी सुविधा आहेत. मात्र, हे वसतिगृह गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडून असल्याची माहिती लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून तटकरे यांना मिळाल्याने शुक्रवारी तटकरे यांनी पालिका आयुक सुधाकर देशमुख आणि पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत वसतिगृहाची पाहणी केली. तसेच वसतिगृह पर्यटन महामंडळ स्वतःहुन सुरू करणार की भाडेतत्त्वावर करता येईल याविषयी चर्चा केल्याचे समजले.
महामंडळाकडून प्रशस्त इमारत उभारली आहे. पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा विभाग आहे. त्यामुळे लवकरच पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह खुले केले जाईल. परिसरातील पांडवकडा धबधबा आणि परिसरातील पर्यटनस्थळांना चालना मिळावी याविषयी आदित्य ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. असेही आदिती तटकरे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूक पटेल, बळीराम नेटके, राजश्री कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)