मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांसाठी तिसऱ्यांदा सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-municipal-corporation

शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच्या २०१७ च्या आरक्षणानुसारच यंदाच्या महानगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांसाठी तिसऱ्यांदा सोडत

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच्या २०१७ च्या आरक्षणानुसारच यंदाच्या महानगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच याआधीच्या २३६ प्रभागांएवजी २२७ प्रभागांनुसारच निवडणुक होणार आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने दोन वेळा आरक्षण सोडत घेतली होती. परंतु आता सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा नव्याने सोडत प्रक्रिया होणार आहे. येत्या काळात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही सोडत प्रक्रिया होईल. 

दर १० वर्षांनी जनगणना होणे आवश्यक आहे. २०११ साली झाल्यानंतर २०१२ व २०१७ साली पालिका निवडणूक घेण्यात आल्या. मात्र त्यानंतर २०२१ साली जनगणना होणे महत्वाचे होते. मात्र जनगणना न घेता लोकसंख्या वाढ झाल्याचे सांगत ९ नवीन वॉर्ड आपल्या सोईने वाढवल्याचा आरोप भाजप व काँग्रेसकडून केला गेला. शहरी भागातील लोकसंख्या कमी होऊन उपनगरांत लोकसंख्या वाढल्याने हे वॉर्ड वाढवल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र याला काहीही आधार नाही असे सांगत भाजपने विरोध केला होता. त्यामुळे सत्तांत्तर झाल्यानंतर भाजपने सदस्यसंख्येत सुधारणा करून हे नवीन ९ वॉर्ड रद्द करून २२७ वॉर्डची संख्या कायम ठेवली आहे.

मुंबई महानगरपालिकेने याआधी ३१ मे रोजी २३६ प्रभागांसाठी सोडत घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ जुलै रोजी सोडत घेण्यात आली. परंतु ३ ऑगस्टला राज्य सरकारने घेतलेल्या कॅबिनेट निर्णयामुळे आता पुन्हा २२७ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून तिसऱ्यांदा सोडत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

आम्ही महापालिकेतील सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. पण ही मागणी अमान्य करण्यात आली. तसेच एका विशिष्ट पक्षाला फायदा होईल, यानुसारच या वॉर्डची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच या प्रकाराविरोधात सर्वात आधी आम्ही मागणी केली होती. २०१७ ची निवडणूक ही २०११ च्या जनगणनेवर आधारीत होती. त्यामुळेच या वाढीव प्रभागांमुळे आम्ही विरोधातील पवित्रा घेतला होता.

- प्रभाकर शिंदे, मुंबई महानगर पालिकेतील माजी गटनेते, भाजप

शिवसेनेने प्रभागांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला आधारून नव्हता. आघाडीत असताना हा निर्णय घटकपक्षांचा अपमान करण्यासारखा होता. मुंबईत कॉंग्रेसला नामशेष करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु राज्य सरकारच्या निर्णयामुळे हा कॉंग्रेसच आणि मुंबईकरांचा मोठा विजय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- मिलिंद देवरा नेते, कॉंग्रेस

Web Title: Draw Third Time For Mumbai Municipal Corporation Ward Structure Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..