esakal | मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण यंत्रणा पडली बंद
sakal

बोलून बातमी शोधा

drinking water shortage

मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण यंत्रणा पडली बंद

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबईतील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बाधित; पालिकेकडून महत्वाच्या सूचना

मुंबई: भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला. दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Drinking Water Purification System breaks down due to heavy rains in Mumbai)

हेही वाचा: Mumbai Rains: सर्व मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द -मध्य रेल्वे

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपायुक्त अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडुप संकुलात उपस्थित आहेत, अशी माहिती दिली.

हेही वाचा: मुंबईकरांनो, जरा जपून... पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा

संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे

loading image