esakal | 'सकाळ'चं स्टिंग ऑपरेशन : ड्रोन विक्रीच्या ब्लॅक मार्केटचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

Drone

'सकाळ'चं स्टिंग ऑपरेशन : ड्रोन विक्रीच्या ब्लॅक मार्केटचा पर्दाफाश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार, मंत्रालय, चित्रपटसृष्टी, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालये असलेल्या मुंबईच्या (Mumbai) प्रगतीवर दहशतवाद्यांची (Terrorist) नेहमीच वाकडी नजर राहिली आहे. ९० च्या दशकातील बॉम्बस्फोटांपासून ते अगदी अलीकडच्या २६/११ हल्ल्यांपर्यंत मुंबईने अनेक वेळा दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला. प्रत्येक घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या बाता केल्या जातात; मात्र कायदे-नियमांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड त्रुटी असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. नुकत्याच जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या कार्यालयावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला. याच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईसह अन्य संवेदनशील ठिकाणी विनापरवाना ड्रोन विक्री आणि उडवण्यास बंदी आहे; मात्र या नियमावलींचे सर्रास उल्लंघन करत मुंबईत बेधडकपणे ड्रोन विक्री सुरू असल्याचे ‘सकाळ’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाले. (Terror Hovering over Mumbai Too)

सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईसह परिसरात ड्रोन विक्रीला बंदी असतानाही मुंबईच्या फोर्ट परिसरातील बोरा बाजार, सेंट्रल कॅमेरा बिल्डिंग परिसर, लॅमिंग्टन रोड, गोरेगावच्या मोतिलाल नगर परिसरात सहजपणे ड्रोन उपलब्ध होतात. ड्रोन विक्रीचा हा काळा धंदा ‘सकाळ’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे. नेमकी ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘टीम सकाळ’ने वरील सर्व परिसरात प्रत्यक्ष जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्या वेळी मुंबईच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.

सीएसएमटीनजीकच्या सेंट्रल कॅमेरा इमारतीजवळील कॅमेऱ्यांच्या दुकानांजवळ ‘सकाळ’ची टीम पोहोचली. तिथे पोहचताच काही दुकानांबाहेरील दलालांनी आमच्याकडे येत तुम्हाला काय हवंय, याबाबत विचारत त्यांच्याकडील विविध कॅमेऱ्यांची माहिती दिली. आमच्यापैकी एका सहकाऱ्याने ड्रोन कॅमेरा हवाय असे सांगितले असता काही जणांनी लगेच माघार घेतली. आम्ही पुढे चालत गेलो. हळूच एकाने आमच्यामागे येत ‘साहब आपको जो चाहिए... वह हमारे पास मिलेगा’, असे दबक्या आवाजात सांगितले. तिथूनच आमच्या स्टिंग ऑपरेशनला सुरुवात झाली.

दुकान क्रमांक एक - सेंट्रल कॅमेरा इमारत

एक व्यक्ती आम्हाला एका दुकानात घेऊन गेली. तेथे आम्ही ड्रोन कॅमेरा हवाय असे सांगितले. ‘सध्या तर ड्रोन कुठेच मिळत नाही, पण हवा असेल तर नॅनो ड्रोन मिळेल, असे दुकानदाराने सांगितले... तुम्हाला कशाला हवाय, काय काम आहे, याबाबत त्याने विचारणा केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या सदर दुकानदाराने मोबाईलवरून एका व्यक्तीला आम्हाला हव्या असलेल्या ड्रोनबाबत सांगितले. त्यावर त्याने काही रक्कम ॲडव्हान्स द्यावी लागेल, ती दिल्यास तुम्हाला ड्रोन आणून देण्याचे मान्य केले. सदर दुकानदाराने ड्रोन कॅमेरा देण्याबाबत दिलेली कबुली एव्हाना आमच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाली होती; मात्र आम्ही एक किलोपेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनवर अडून बसलो. अखेर त्याने ‘मिला तो फोन पर बताऊंगा’ असे सांगितल्यावर आम्ही त्या दुकानातून बाहेर निघालो.

दुकान क्रमांक दोन - सेंट्रल बार परिसर

आमचे ऑपरेशन इथेच संपले नाही. पुढे आणखी काही कॅमेऱ्यांच्या दुकानांत ड्रोन कॅमेऱ्याबाबत चौकशी केली. त्यावर तुमच्याकडे परवाना आहे का असे आम्हाला विचारले. आम्ही हो म्हटल्यावर त्याने काकाच्या दुकानात जायला सांगितले. आम्ही लगेच बोरा बाजार परिसरातील सेंट्रल बारच्या दिशेने निघालो. रस्त्याने चालताना आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या दुकानांवर आमची नजर होतीच. तेथील एका दुकानात ड्रोनबाबत चौकशी केल्यावर एका दुकानदाराने आधी हो, नंतर नाही बोलून वेळ मारून नेली. त्याच्या दुकानातून बाहेर पडताच तिथेच उभ्या असलेल्या एका तरुणाने ‘साहब, आपको आगेवाली गली में मिलेगा’ असे दबक्या आवाजात सांगितले. आम्ही त्यानुसार पुढे चालत गेलो. एका उंच आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या विक्रेत्याकडे ड्रोनबाबत चौकशी केली. तुम्हाला कशासाठी हवा आहे, असे त्याने खर्जातील आवाजात सूर वाढवून विचारले. आम्हाला लग्नसोहळा चित्रित करायचा आहे, असे कारण दिल्यावर त्याने आम्हाला दुकानात घेतले. ‘आता ड्रोन मिळत नाही, पण तुमचा नंबर द्या, मी चौकशी करून कळवतो’, असे आश्वासन त्याने आम्हाला दिले. पुढे कुठे मिळणार नाही असे त्याने आम्हाला सांगितले.

दुकान क्रमांक तीन - एम्पायर बिल्डिंग

आमचा ड्रोनचा शोध संपलेला नव्हता. त्या दुकानातून बाहेर पडताच एक जण पुढे आला आणि म्हणाला ‘साहब, आपको जो बडा वाला ड्रोन चाहिए ना, वह मैं दिला देता हूँ, आप सिर्फ मेरे साथ चलो...’ आम्ही लगोलग त्याच्यामागे चालत गेलो. रस्ता ओलांडून त्याने आम्हाला सेंट्रल कॅमेरा बिल्डिंगसमोरील कॅमेऱ्याच्या मोठ्या दुकानात नेले. तेथील दुकानदाराने विचारणा केल्यावर आम्हाला ड्रोन हवे असल्याचे सांगितले. ते ऐकून सुरुवातीला त्याने आमच्याकडे एक कटाक्ष टाकत धीरगंभीर आवाजात ‘कौनसा चाहीए’ असा प्रतिप्रश्न केला. आम्ही एकामागे एक विविध ड्रोन कंपन्यांची नावे सांगितली. आम्ही सांगितलेल्या गरजेनुसार एक किलोपेक्षा अधिक वजनाच्या वस्तू उचलण्याची क्षमता असलेले काही अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध असल्याचे काही क्षणात सांगितले. हे सारे पाहून आम्हीसुद्धा अवाक् झालो. ‘हमें ड्रोन चाहीए, बजेट की चिंता मत करो’ असे बोलल्यावर त्याने लगेच दुसऱ्या सहकाऱ्याला फोन करून ड्रोनच्या किमतीबाबत माहिती घेतली. एक लाख ९५ हजार, एक लाख ९२ हजार आणि... तिसऱ्याची एक लाख ४५ हजार अशा विविध कंपन्यांच्या आणि क्षमतेच्या ड्रोनच्या किमती त्याने आमच्यासमोर ठेवल्या. आम्ही ड्रोन पाहायला मागितला. ‘साहब, आपको देखने नही मिलेगा, चाहिए तो बोलो, पैसा भरो और ड्रोन लेके जाओ’ असे त्याने आम्हाला सांगितले. ‘किमत कुछ कम होगी’, असे त्याला विचारल्यावर ‘एक रुपया भी कम नही होगा, ७० टक्के ॲडव्हान्स पैसे भरो, उस के बाद आधे घंटे में मेरा लडका ड्रोन लेके आएगा’ अशी खात्री दुकानदाराने दिली. ऑनलाईन, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पैसे घेणार का असे विचारल्यावर ‘नहीं साहब, आपको कॅश देना पडेगा और उस के बदले आपको बिल भी नही मिलेगा. सिर्फ ड्रोन वह भी आप के जिम्मेदारीपर’, असे सांगितल्यावर आम्ही लगेच ड्रोन खरेदीला होकार दिला. पैशांची तजवीज करतो, असे सांगत आम्ही त्या दुकानातून काढता पाय घेतला. तोपर्यंत मुंबईच्या सुरक्षेचे धिंडवडे काढणाऱ्या या सर्व धक्कादायक बाबी ‘सकाळ’च्या कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.

ड्रोन विक्रीची मोडस ऑपरेंडी

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पोलिसांच्या भीतीपायी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम प्रकारातील ड्रोनची मुंबईत छुप्या पद्धतीने सर्रास विक्री केली जात आहे. ड्रोन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकावर जोपर्यंत विश्वास बसत नाही, तोपर्यंत ड्रोन उपलब्ध असल्याचे बहुतांश विक्रेते मान्यच करत नाहीत. ग्राहकाचे हावभाव, बोलण्याची पद्धत आणि एकूण वर्तणुकीतून त्यांचा विश्वास बसल्यावर ते लगेच सहकाऱ्याला फोनवरून ड्रोनबाबत माहिती घेतात आणि त्याची किंमत ग्राहकांना सांगितली जाते. ड्रोन खरेदीसाठी क्रेडिट, डेबिट, ऑनलाईन बँकिंग, धनादेश आदी पद्धतीने व्यवहार चालत नाही. केवळ रोख स्वरूपात पैसे घेऊन ड्रोन विकला जातो. ग्राहकाने सदर किमतीला ड्रोन खरेदीला होकार दिल्यावर पहिली ७० टक्के रक्कम ॲडव्हान्स म्हणून रोख स्वरूपात जमा करून घेतली जाते. पैसे मिळाल्याची खात्री झाल्यावर एक अनोळखी व्यक्ती तुमच्याजवळ एका बॉक्समधून ड्रोन घेऊन येतो. दुकानात आणून देण्याऐवजी ड्रोनचा बॉक्स तुमच्या गाडीत किंवा अन्य ठिकाणी आणून दिला जातो आणि पुढच्या क्षणाला तो व्यक्ती पसारही होतो, कोणतेही बिल, गॅरंटी वा वॉरंटी न देता…

भाड्यानेही सहज मिळतात ड्रोन

मुंबईत फोर्ट परिसरातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांचा शोध सुरू असताना एका कॅमेरा विक्रेत्याने आम्हाला गोरेगावातील मोतिलाल नगर परिसरात भाड्यानेही ड्रोन उपलब्ध होत असल्याचे सांगितले. हे ऐकताच आमची टीम गोरेगावला रवाना झाली. मोतिलाल नगर येथील अनेक बैठ्या चाळींमध्ये सिनेमा, मालिका तसेच जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी कॅमेरे भाड्याने देणाऱ्या दुकानांमध्ये आम्ही गेलो. त्यातील एकाने चक्क १० ते १५ हजार रुपयांपर्यंत हवा तो ड्रोन कॅमेरा सहजपणे उपलब्ध असल्याचे सांगितले. हा संवादही ‘सकाळ’च्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता.

कुरियरनेही ड्रोन उपलब्ध

मुंबईत ड्रोन हवा असल्यास कोणकोणत्या मार्गाने उपलब्ध होतात, याबाबत माहिती घेत असताना सूत्रांकडून दिल्लीतील एका ड्रोन विक्रेत्याची माहिती मिळाली. त्याच्याशी संपर्क साधून आम्हाला हव्या असलेल्या ड्रोनबाबत विचारणा केली. त्याने हवा तो ड्रोन मिळेल असे सांगितले, परंतु आम्हाला मुंबईत कसा मिळणार, याबाबत विचारले असता, एका नामांकित कुरियर कंपनीने ड्रोन पाठवला जाईल, असे सांगितले. त्यामुळे कुरियर कंपनीद्वारे येणाऱ्या वस्तूंद्वारेही मुंबईच्या सुरक्षेला धोका असल्याचे ‘टीम सकाळ’च्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले.

टीम सकाळ : सुजित गायकवाड, ऋषिराज तायडे, करुणा ढोले

loading image