धक्कादायक! 'या' महापालिकेकडून वर्षभरात केवळ १४ प्रकारची औषधे खरेदी!

'या' महापालिकेकडून औषधे खरेदीत दिरंगाई!
'या' महापालिकेकडून औषधे खरेदीत दिरंगाई!

नवी मुंबई : आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या औषधखरेदीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 168 प्रकारच्या औषधांपैकी महापालिकेकडून वर्षभरात केवळ 14 प्रकारची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. शुक्रवारी (ता. 29) पार पडलेल्या स्थायी समितीच्या कामकाजादरम्यान ही बाब उघडकीस आल्यामुळे नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरत जाब विचारला. 

महापालिकेतर्फे बेलापूर, नेरूळ, वाशी व ऐरोली येथे सामान्य रुग्णालय आणि इतर नागरी आरोग्य केंद्र चालवण्यासाठी भव्य व आलिशान इमारती उभारण्यात आल्या आहेत. परंतु या रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि औषधे उपलब्ध करण्यात अद्यापही पालिकेला अपयश आले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने डॉक्‍टर भरती करून डॉक्‍टरांची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला; मात्र औषधांच्या तुटवड्याचे लागलेले ग्रहण काही सुटेना. शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या कामकाजात पुन्हा आरोग्य विभागाच्या उदासीन कामाचा नमुना उघड झाला. 19 जानेवारी 2019 रोजी आरोग्य विभागाने सर्वसाधारण सभेत 168 प्रकारची औषधे खरेदीच्या 10 कोटी नऊ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली होती, परंतु तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य विभागाने केवळ 14 प्रकारची औषधे खरेदी केली असल्याची धक्‍कादायक बाब उघड झाली आहे. औषध खरेदीसाठी तयार केलेल्या तीन समूहांपैकी दोन करिता निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. 168 पैकी 98 औषधांना दर मिळाले. उर्वरीत 70 औषधांसाठी पुन्हा फेरनिविदा राबवण्यात आली; मात्र पुरेशा निविदा न आल्यामुळे मुदतवाढ देऊन फेरनिविदा राबवण्यात आली. महापालिकेतर्फे 19 जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत निविदांच्या या खेळात 70 पैकी फक्त 14 बाबींची खरेदी करता आली. उर्वरित 56 औषधांसाठी प्रशासनातर्फे पुन्हा फेरनिविदा राबवली जाणार आहे. 

प्रश्‍नांचा भडीमार 
आरोग्य विभागातर्फे औषधांसाठी निविदा प्रक्रिया राबवताना शिल्लक राहिलेल्या औषधांच्या खरेदीसाठी प्रशासनाला का प्रतिसाद मिळाला नाही. अद्याप खरेदी का करता आलेली नाही. प्रशासन आतापर्यंत फक्त कागदी घोडे का नाचवत बसले आहे. औषधांना प्रतिसाद मिळत नव्हता; तर एक पॅनेल नेमून प्रश्‍न का सोडवला नाही, अशा अनेक प्रश्‍नांचा भडीमार नगरसेवकांनी केला; मात्र त्यावर प्रशासनातर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा, अशा सूचना स्थायी समिती सभापतींनी दिल्या. 

महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आला आहे. तरीसुद्धा प्रशासनाला रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध होत नसतील ही बाब गंभीर आहे. पालिकेने रुग्णालयांच्या इमारती चांगल्या तयार केल्या; मात्र या इमारतींमध्ये गोरगरीब रुग्णांना औषधे मिळत नाहीत. याबाबत पुढील स्थायी समितीमध्ये जाब विचारला जाणार आहे. 
- दिव्या गायकवाड, नगरसेविका 

औषधांच्या खरेदीसाठी आलेले दर बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे खरेदी करता आलेले नाहीत. बाजारभावापेक्षा 20 टक्के दर जास्त होते. वाढीव दर कमी करता येतील का, अशी कंत्राटदारांसोबत चर्चा सुरू आहे. यादरम्यान आचारसंहिता लागल्यामुळे औषधांची खरेदी थांबवण्यात आली होती. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू झाली. जी औषधे उपलब्ध नाहीत, ती 2020 साठी खरेदी केली जात आहेत. सध्या रुग्णालयात पुरेशी औषधे उपलब्ध केली आहेत. 
- बी. एस. सोनावणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी. 

प्रशासनाने प्रस्ताव सादर करताना गरजेनुसार औषधांचा क्रम ठरवणे अपेक्षित आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला असेल तर खरेदीद्वारे नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये तत्काळ औषधांचा साठा उपलब्ध करावा. 
- नवीन गवते, स्थायी समिती सभापती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com