अमली पदार्थ तस्करीप्रकरणी तिघांना 10 वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - अमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप असलेल्या तिघांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लंडन येथे शिक्षण घेतलेला आणि अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला आलिशान शर्मा लंडनमधील माफियांना भारतातील हस्तकांकडून अमली पदार्थ पुरवण्याचे रॅकेट चालवायचा. रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमध्ये हशीश, मेथॅम्फेटामाइन आदी अमली पदार्थ पुरवले जातात. अन्नपदार्थ असल्याचे दाखवून अमली पदार्थांची लंडनला निर्यात केली जात होती. या कामासाठी शर्मा याला हवाला रॅकेटद्वारे मोबदला मिळत होता. किरण जंगले हा अन्नपदार्थांच्या खोक्‍यांत अमली पदार्थ भरायचा, तर विदेशातून आलेली रक्कम घेऊन कुरिअरद्वारे पार्सल पाठवण्याचे काम किरण कुमार करत असे, असा आरोप होता. महसूल गुप्तचर महासंचालनालयाने या तिघांना अटक केली होती. न्यायालयाने या तिघांनाही दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
Web Title: Drugs Smuggling Crime Punishment