करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशांचा गजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

मिरा-भाईंदरमध्ये जनजागृतीसाठी पाऊल; उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेतर्फे विविध उपक्रम 

भाईंदर ः आर्थिक वर्ष सरत आल्याने वेगवेगळ्या करांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका अनेक उपक्रम राबवत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष संपत आले असतानादेखील अपेक्षित करवसुली झाली नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

रायगड झेडपी असा साधणार विकास

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. यंदा १८१ कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; परंतु मार्च उजाडला, तरी ६९ टक्केच करवसुली करणे प्रशासनाला शक्‍य झाले आहे. आतापर्यंत एकूण १२१ कोटी करवसुली पूर्ण झाली असली, तरी  त्यात अधिकाधिक ४० कोटी तरी भर व्हावी, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. कर बिलाच्या निर्मितीस विलंब, करधारकांची  उशिरा कर भरण्याची सवय; तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोल-ताशा वाजवण्याची उपाययोजना पालिकेने अंमलात आणली आहे. 

मेट्रो-4 मार्गिकेचे काम या कारणामुळे थंडावले

शहरातील विकास; तसेच योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सरकारच्या अनुदानासह करवसुलीतून मिळणारा पैसा अत्यंत महत्त्वाचा असतो; परंतु अद्यापही अपेक्षित करवसुली झाली नसल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. करवसुलीसाठी सुट्टीच्या दिवशीदेखील अधिकाऱ्यांची नेमणूक करून अधिकाधिक करवसुलीकडे लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे थकबाकीधारकांचे जाहिरातीवर नाव, फलक आणि ढोल-ताशांचा गजर अशा विविध मार्गांचा वापर करून शहरात करवसुली करण्यात येत आहे. 

शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या उत्पन्नाचा निधी अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे यंदा अनेक उपक्रम राबवून अधिकाधिक करवसुली करण्यावर आमचे मुख्य लक्ष आहे. त्यासाठी सुट्टीच्या दिवशीदेखील करवसुली करण्यात येत आहे. 
चंद्रकांत डांगे, आयुक्त, मिरा-भाईंदर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drum alarm in front of outstanding home for tax collection in Mira-Bhyander near Mumbai