तलावपाळी परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर

तलावपाळी परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर

ठाणे : तलावांचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे शहराची तलावपाळी असलेल्या मासुंदा तलावाभोवती सुशोभीकरण करून तलावाचे रुपडे पालटले आहे. मात्र, या सुशोभीकरणाला काही सामाजिक अपप्रवृत्तीमुळे गालबोट लागले असून तलाव किनाऱ्यावर नुकत्याच बांधण्यात आलेल्या ओपन गॅलरीमध्ये सद्यस्थितीत नशेबाज आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे, या गॅलरीशेजारीच पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक असतानाही नशेबाजांकडून मद्याच्या बाटल्या इतस्ततः फेकण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या ओपन गॅलरीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असून तलावपाळीवर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
शिलाहार काळापासून ब्रिटीश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून गणले जाते. ठाण्यात एकूण 65 तलावांपैकी 33 तलाव अस्तित्वात आहेत. ठाण्यातील मासुंदा तलाव त्यापैकीच एक आहे. हा तलाव ठाणे महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने तलावाची देखभाल व निगा महापालिकेमार्फत केली जाते. सध्या मासुंदा तलावाचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्याअन्वये तलावाच्या सभोवती भव्यदिव्य आसन व्यवस्था आणि ओपन गॅलरीचे बांधकाम करण्यात आले आहे. गडकरी रंगायतननजीक असलेल्या तलावाशेजारील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकानजीकच्या परिसरात विस्तीर्ण अशी ओपन गॅलरी बांधण्यात आली आहे. यासाठी महापालिकेकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

 रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर
सध्या या गॅलरीमध्ये पर्यटक कमी; तर गर्दुल्ले आणि नशेबाजांचा वावर दिसून येतो आहे. त्याठिकाणच्या आसनांवर चक्क पान व गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसत असल्याने अहिल्याबाईच्या स्मारकाचीही विटंबना होत आहे. मद्यपी या ठिकाणी रात्री पार्ट्या झोडून दारूच्या रिकाम्या बाटल्या इतस्ततः फेकून देत असल्याने महापालिकेची साफसफाईदेखील यथातथाच असल्याची टीका येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


मासुंदा तलावाभोवताली बसण्यासाठी कठडे उभारले असून अद्याप काम प्रगतिपथावर आहे. येथील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेसोबतच नागरिकांचीदेखील आहे. तेव्हा, सर्वांनी जबाबदारी ओळखून तलाव परिसरात असे समाजविघातक प्रकार टाळायला हवेत. दर रविवारी प्रतिष्ठानच्यावतीने आम्ही पुण्यश्‍लोक अहिल्याबाईच्या स्मारक परिसराची स्वच्छता करीत असतो.
तुषार धायगुडे, धनगर प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com