यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

दिनेश चिलप मराठे
Wednesday, 11 November 2020

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या जाचक नियमामुळे दिवाळी फिकी होण्याची चिन्हे दिसताहेत. आवाज मुक्त फटाके, ध्वनी प्रदूषण, धूर प्रदूषण मुक्त दिवाळीच्या संकल्पनेमुळे सामान्य विक्रेते मात्र दिवाळं निघाल्याचे सांगत सरकारला दोष देताहेत.

मुंबई- दिवाळ सण म्हटले की कंदिल, गोड धोड़ फराळ आणि धमाकेदार फटाके यांच्या पर्वणीचा वार्षिक महोत्सव असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या जाचक नियमामुळे दिवाळी फिकी होण्याची चिन्हे दिसताहेत. आवाज मुक्त फटाके, ध्वनी प्रदूषण, धूर प्रदूषण मुक्त दिवाळीच्या संकल्पनेमुळे सामान्य विक्रेते मात्र दिवाळं निघाल्याचे सांगत सरकारला दोष देताहेत.

मश्जिद बंदर येथील झकेरिया मशिदी पासून ते मश्जिद बंदर स्टेशनपर्यंत रांगेत फटाक्यांच्या विक्रीचे स्टॉल प्रतिवर्षी दिवाळीत लागत असतात. पण यंदा फटाके मुक्त दिवाळी या सरकारी घोषणामुळे पालिकेच्या कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या व्यापारी वर्गाने रांगेत दुकाने थाटलीच नाहीत. मोहम्मदली रोड लगत असलेला यूसुफ मेहर आली रोड येथेही फटाक्यांची दुकाने पोलिसांची आणि महानगर पालिकेकडून तात्पुरत्या परवानगी घेत सजत असत. पण यंदा परवानगी मिळालीच नसल्याने दुकाने सजलीच नाहीत.

अधिक वाचा-  दिवाळीत दोन जैन मंदिरे उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

दिवाळीत लाखोंची उलाढाल येथे होत असते. किरकोळ, घाऊक आणि सामान्य ग्राहकही येथून फटाके खरेदी करत असतात. शिवकाशी येथून यंदा मोठ्या प्रमाणात माल मागविला गेला नाही.

गेल्या पंधरा दिवसात ज्यांनी लाखोंचा माल खरेदी केला त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. सरकारने चार महिन्यापूर्वी अशी आवाज आणि धूर मुक्त फटाके घोषणा केली असती. तर आम्ही लाखोंची खरेदी केलीच नसती, उधारीवर माल घेतलाच नसता असे काही व्यापाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अचानक सरकार निर्णय घेते आणि जाहीर करते हे फार चुकीचे आहे. व्यापारी वर्गाला ऐन दिवाळीच्या उंबरठयावर मोठा झटका बसला आहे.

दिवाळसण आवाज फटाका  विना साजरा करण्यात येणार असल्याचा कारणांने मोठ्या आवाजाचे फटाके थोडक्यात मुंबई महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे विक्रेत्यांना बरोबरच ग्राहकांचाही मोठा हिरमोड झाल्याचे दक्षिण मुंबईत पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईतील मश्जिद बंदर हा विभाग फटाके विक्रीच्या दुकानांसाठी सुप्रसिद्ध असून येथील मोहम्मद अली रोड उषाबाई फायर वर्क येथेही फटाके खरेदीसाठी ग्राहकांची होणारी झुंबड तोरणाच्या आणि पालिकेने आणलेल्या बंदीच्या अनुषंगाने कमी झाल्याचे जाणवत आहेत.

अधिक वाचा- कांजूरमार्ग कारशेड प्रकरणः जमिनीच्या मालकाकडून आयुक्तांना कायदेशीर नोटीस

यंदा व्यवसाय अडचणीत आहे. मोठ्या आवाजात वाजणारे फटाके विक्रिस बंदी असल्याचे परवाच पालिका अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत. गेल्या वर्षीचाच माल विक्री होत आहे. फुलबाजी, छत्री, अनार, रोलकेप, पाऊस आदी आवाज नसणारे फटाकयांची विक्री होतेय. 50 टक्केही माल विकला गेला नाही. कोरोनामुळे लोकांच्या उत्साहावर पाणी पडलेले आहे. त्यातच सरकारी नियमांमुळे ग्राहकाच्या मनाजोगता माल विकता येत नसल्याने निराशा आहे.
अब्दुल्ला घीया, (डायरेक्टर - इसाभाई फायर वर्क्स प्रा.लि. )

आम्ही या दिवाळीत दुकान मांडलेच नाही. आधी कोरोनामुळे 7 महिने रोजगार बुडाला. आता दिवाळीत चार पैसे कमावायची आलेली संधी सरकारने हिरावून घेतली आहे.
मोहम्मद रफीक

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखला जावा आणि आवाज, ध्वनी आणि धूर प्रदूषण होऊ नये म्हणून पालिकेतर्फे नागरिक आणि फटाके विक्रेते यांना सूचना देण्यात आल्या असून धूर प्रदूषणामुळे कोविड संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन फटाके मुक्त दिवाळी अशी संकल्पना कडकपने राबविली जात आहे. सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मोकळया जागी ध्वनी आणि धूर मुक्त फटाके वाजविण्यास सूट देण्यात आलेली आहे. दिवाळ सणाचे महत्व असल्याने पहिल्या दिवशी आणि लक्ष्मी पूजन दिनी आवाज नसलेले आणि धूर कमी येणारे फटाके फोडण्यास हरकत नाही.
चक्रपाणी अल्ले, सहाय्यक आयुक्त, बी व सी विभाग

यंदा दिवाळी आवाज आणि धूर मुक्त असल्याचे स्वागत व्हायला हरकत नाही कारण आपण आता असाध्य अशा कोविड संसर्गशी लढत आहोत. या वर्षी थोडा संयम ठेऊ यात पुढच्या वर्षी जोषात दिवाळी साजरी करु.
चंद्रकांत शिंगाडे,  ग्राहक
-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Due corona firecracker shops in Masjid Bunder are empty


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due corona firecracker shops in Masjid Bunder are empty