नवी मुंबईकरांचा जलप्रवास स्वप्नातचं! 'ही' आहेत कारणे...

नवी मुंबईकरांचा जलप्रवास स्वप्नातचं! 'ही' आहेत कारणे...
नवी मुंबईकरांचा जलप्रवास स्वप्नातचं! 'ही' आहेत कारणे...

नवी मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाईम बोर्ड आणि सिडको यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा या सेवेसाठी पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. रो-रो जहाजांमुळे जेटीजवळ खोदकाम करावे लागत असल्यामुळे प्रकल्पात तब्बल 43 कोटींच्या खर्चाची वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला सिडको आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने विरोध केला आहे. त्यामुळे नवी मुंबईऐवजी आता अलिबाग ते भाऊचा धक्का या मार्गावर पहिली रो-रो सेवा सुरू होणार आहे. 

सागरी किनारपट्टीवरील शहरांदरम्यान जास्तीत जास्त जलवाहतूक विकसित करून वाहतूक व्यवस्थेमध्ये आणखी नवीन पर्याय तयार करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नेरूळ ते भाऊचा धक्का व नेरूळ ते मांडवा जेट्टी रो-रो सेवेची घोषणा केली होती. त्याप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको व मेरिटाईम बोर्ड यांच्यातर्फे ही सुविधा भागीदारीत चालवली जाणार आहे. सिडकोतर्फे गेले वर्षभर नेरूळ येथील टीएस चाणक्‍यच्या मागील बाजूला खाडीकिनारी तब्बल 2 हेक्‍टरवर 111 कोटी रुपये खर्च करून जेट्टी उभारली जात आहे. सध्या जेट्टीचे 70 टक्के पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. जूनपर्यंत हे बांधकाम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, हा संपूर्ण परिसर खाडीकिनारी असल्यामुळे या जागेवर मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. जेट्टीच्या बांधकामामुळे 1 हेक्‍टरपेक्षा जास्त जागेवरील कांदळवने सिडकोने काढून त्या जागेवर उन्नत मार्ग तयार केला जात आहे. मात्र, सुरुवातीला प्रकल्पाच्या रचनेत नादुरुस्ती आल्यामुळे जेटी उभारण्याचे काम संथ गतीने सुरू होते; परंतु मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष डॉ. एन. रामास्वामी यांनी पूढाकार घेत दुरुस्ती सुचवून प्रकल्प मार्गी लावला आहे. 

43 कोटींचा वाढीव खर्च 
नेरूळमध्ये खाडीकिनारी तयार होत असलेली जेट्टीची खोली कमी असल्यामुळे मोठ्या आकाराची जहाजे येण्यासाठी खाडीतील खोली वाढवावी लागणार आहे. ही खोली वाढवण्यासाठी खोदकामावर पुन्हा 43 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या वाढीव खर्चामुळे प्रकल्पाची किंमत वाढणार असल्याने त्याला पोर्ट ट्रस्ट आणि सिडको यांनी विरोध केला आहे. या वादावर मेरिटाईम बोर्डाकडून नवा पर्याय सुचवला जात आहे, असे सांगण्यात येत आहे. 

नेरूळ ते भाऊचा धक्का या मार्गावर रो-रो सेवेऐवजी स्पीड बोट चालवण्यात येणार आहे. खोली कमी असल्यामुळे या मार्गावर रो-रो सेवा चालवणे प्रशासनाला अडचणी येत होत्या. मात्र, नागरिकांना जलवाहतुकीचा पर्याय देण्यासाठी या मार्गावर स्पीड बोट चालवण्याचा मेरिटाईम बोर्डाचा विचार आहे. त्यानुसार मेरिटाईम बोर्डाने स्वारस्याची अभिव्यक्ती मागवल्या आहेत. चांगले दर प्राप्त झाल्यावर या मार्गावर जलसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. 
- डॉ. एन. रामास्वामी, अध्यक्ष, मेरिटाईम बोर्ड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com