पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर भारत बिजली येथे वाहतूक कोंडी झाली होती; तर रबाळे टी जंक्‍शनजवळ देखील साचलेल्या पाण्यामुळे घणसोलीकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी झाली होती.

नवी मुंबई : मागील आठवड्यापासून संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, बुधवारी सकाळपासूनच ठाणे-बेलापूर मार्गावर भारत बिजली येथे वाहतूक कोंडी झाली होती; तर रबाळे टी जंक्‍शनजवळ देखील साचलेल्या पाण्यामुळे घणसोलीकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ठाणे-बेलापूर मार्गावर असणाऱ्या काँक्रीटीकरणाच्या बाजूला असणाऱ्या डांबरी रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत; तर पावसामुळे सिग्नल यंत्रणेमध्येदेखील बिघाड झालेला आहे. त्यामुळे ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर भारत बिजली सिग्नलजवळ सकाळपासून दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. याच मार्गावर माईंड स्पेस कंपनीजवळ रिक्षाचालकदेखील बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली; तर वाशीकडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर रबाळे टी जंक्‍शनजवळ साचत असणाऱ्या पाण्यामुळे व रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग पुर्णपणे मंदावला होता. भरपावसामध्ये उभे राहून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत होते. इलठण पाडा येथील ब्रिटीश कालीन धरण भरून वाहत असल्यामुळे त्याचे पाणी विसर्गाचे प्रमाण वाढले होते. तर धरणाचे पाणी जाणऱ्या ऐरोली येथील माइड स्पेस कंपनीच्या बाजूला असणारा नाला ओसंडून वाहत होता. नाला भरलेला असल्यामुळे त्याचे पाणी ठाणे बेलापूर मार्गावर येऊन तळ्याचे स्वरूप झाले होते. त्यामुळे वाहुतकीचा वेग मंदावला होता.

ठाणे-बेलापूर मार्गाच्या रस्त्याच्या कडेला डांबराचा असणारा पट्टा पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहन चालवणे या मार्गावरून जिकिरीचे होत आहे; तरी या मार्गाच्या डांबरी भागावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
- राकेश मोकाशी, वाहनचालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rains traffic jam on Thane-Belapur road