esakal | #WorldStrokeDay - चक्कर आल्यावर कांदा, चपलेचा वास देऊ नका; कारण आहे गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

#WorldStrokeDay - चक्कर आल्यावर कांदा, चपलेचा वास देऊ नका; कारण आहे गंभीर

अनेकवेळा स्ट्रोक आल्यानंतर अनेकजण घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात आणि त्यामुळेच मृत्युदर वाढतो.

#WorldStrokeDay - चक्कर आल्यावर कांदा, चपलेचा वास देऊ नका; कारण आहे गंभीर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस पक्षाघात किंवा ब्रेन अटॅक या गंभीर आजाराची माहिती जनसामान्यांना व्हावी आणि या आजाराची कारणे आणि उपचाराची जागरुकता निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो. ब्रेन अटॅक हा गंभीर आजार आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो. 

भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला 6 व्यक्ती पक्षाघाताच्या आजाराला बळी पडतात, अशी माहिती उपलब्ध आहे. परंतु, भारतामध्ये विविध आजारांचे एकत्रित संकलन नसल्यामुळे हा आकडा जास्त असू शकतो, यासोबतच सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे आजही एखाद्या व्यक्तीला चक्कर आली. तर, त्या व्यक्तीच्या नाकाजवळ चप्पल अथवा कांदा नेला जातो यामुळे त्या व्यक्तीला असलेल्या गंभीर आजारावर सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. वारंवार चक्कर येत असेल तर चक्कर कशामुळे येते व तिच्यावर काय उपचार करणे आवश्‍यक असते याची माहिती असायला हवी. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्या शिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही.

महत्त्वाची बातमी : हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्‍तींना किंवा मधुमेह, रक्‍तदाब, हृदयविकार, अर्धांगवात अशा प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्‍यक असते.

अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मेंदूविकार तज्ञ डॉ. समीर पारेख यांनी सांगितले की, " स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात हे जगातील अपंग होण्याचे पहिले कारण असून मृत्यूचे तिसरे कारण आहे. तरीसुद्धा यावर आपल्याकडे जनजागृतीचा खुपच अभाव आहे. हा आजार कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो, पक्षाघात आल्यावर 30 ते 35  टक्के नागरिकांचा मृत्यू होतो तर 30 टक्के नागरिकांना अपंगत्व येते असा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अंदाज आहे.

अनेकवेळा स्ट्रोक आल्यानंतर अनेकजण घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात आणि त्यामुळेच मृत्युदर वाढतो. कारण, स्ट्रोक आल्यानंतर चार तासाच्या आत उपचार मिळाले तर तो रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. 

सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये म्हणजेच मार्च ते ऑगस्टदरम्यान अनेक नागरिक या आजाराला बळी पडले आहेत. मेंदूला ऑक्सिजन आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यात दोष निर्माण झाल्यामुळे पक्षाघाताचा आजार होतो. आज शहरामध्ये अनेक जेष्ठ नागरिक हे एकटे राहतात. शहरातील बंद फ्लॅट संस्कृतीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक या आजाराचे शिकार होतात. कारण, त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या आजाराच्या सुरुवातीला  डोकेदुखी व चक्कर अथवा भोवळ येते अशावेळी मेंदूविकार तज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार करणे गरजेचे असते. आजमितीला भारतामध्ये मेंदू विकारांवर अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. भारतामध्ये मेंदूविकाराचे प्रमाण हे वाढत असून दरवर्षी 7 लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू हा ब्रेनस्ट्रोकमुळे  होतो." 

महत्त्वाची बातमी : तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? 

ब्रेन स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताची अनेक कारणे असू शकतात परंतु आनुवंशिकता म्हणजेच आई अथवा वडिलांना हा जर असेल तर त्यांच्या मुलांनी खूप दक्षता घेतली पाहिजे तसेच अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव सतत मद्यपान आणि धूम्रपान करणे या सवयीसुद्धा ब्रेन स्ट्रोक होण्यासाठी कारणीभूत ठरतात, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मेंदूविकार तज्ञ डॉ. समीर पारेख यांनी दिली. स्पर्श न समजणे, बोलताना अडचणी येणे, अंधुक दिसणे, चालताना तोल जाणे, वारंवार चक्कर येणे,चेहऱा वाकडा होणे, डोकेदुखी ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत.

due to some indian rituals awareness about brain related issues increasing