तोतया टीसीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात बुधवारी (ता. १३) प्रवाशांची तिकीट तपासणी करणाऱ्या बनावट तपासनीसास रंगेहाथ अटक करण्यात आली.

मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात बुधवारी (ता. १३) प्रवाशांची तिकीट तपासणी करणाऱ्या बनावट तपासनीसास रंगेहाथ अटक करण्यात आली. दादर जीआरपीने या बनावट तपासनीसाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दादर स्थानकातील पादचारी पुलावर बुधवारी दुपारच्या वेळेत मुख्य तिकीट निरीक्षक एन. बी. सकपाळ यांनी एका अज्ञात व्यक्तीला तिकीट तपासणी करताना पाहिले.

अणुशक्ती नगर येथे राहणारा गौतम विश्‍वास सहस्रबुद्धे (२०) असे या बनावटी टीसीचे नाव आहे. तो दादर स्थानकात तिकीट तपासणी करत होता. या वेळी एन. बी. सकपाळ यांनी गौतम सहस्रबुद्धे याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्यावेळी या तपासनीसाकडे कोणतेही ओळखपत्र उपल्बध नव्हते. एन. बी. सकपाळ यांनी अधिक चौकशी केल्यानंतर गौतम सहस्रबुद्धे हा बनावट तपासनीस असल्याचे समोर आले. दादर जीआरपीने या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: duplicate ticket checker arrested in mumbai