हनुमान फळे नवी मुंबईत लवकरच अवतरली  

शरद वागदरे
Monday, 9 November 2020

दरवर्षी हनुमान फळांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यांत सुरू होतो. यंदा ऑक्‍टोबर महिन्यापासूनच हंगाम सुरू झाला आहे. फळ बाजारात सध्या अहमदनगर, सोलापूरमधील बार्शी तसेच बीड जिल्हामधून फळांची आवक होत आहे.

वाशी  : सीताफळ आणि रामफळाच्या जातकुळीतील फळ असलेल्या हनुमाळ फळाचा हंगाम यंदा लवकर सुरू झाला आहे. हनुमान फळ थंड असल्याने त्याला फारशी मागणी नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या फळाला 30 टक्के कमी दर मिळत आहे. 
गतवर्षी प्रतवारीनुसार एक किलो हनुमान फळाला प्रतिकिलो 40 ते 100 रुपये दर मिळाला होता. यंदा हनुमान फळाला 20 ते 70 रुपये असा दर मिळत आहेत. यंदा या फळाला मागणी कमी असून दरात घट झाली असल्याची माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी अमित बोरसे यांनी दिली. 

खूशखबर : प्रतिबंधित क्षेत्रात रूग्ण घटले 

दरवर्षी हनुमान फळांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यांत सुरू होतो. यंदा ऑक्‍टोबर महिन्यापासूनच हंगाम सुरू झाला आहे. फळ बाजारात सध्या अहमदनगर, सोलापूरमधील बार्शी तसेच बीड जिल्हामधून फळांची आवक होत आहे. हनुमान फळ हे रामफळ, सीताफळाच्या जातकुळीतील आहे. हनुमान फळाचा आकार ओबड-धोबड असतो. चवीला गोड असलेल्या या फळाचा गर आइस्क्रीमप्रमाणे खाता येतो. सीताफळापेक्षा हनुमान फळात बिया कमी असतात. या फळाचे वजन शंभर ग्रॅमपासून एक किलोपर्यंत असते. सध्या बाजारात 150 ते 200 क्विंटल ही फळे बाजारात आली आहेत, अशी माहिती व्यापांऱ्यानी दिली. 

हे वाचा : आरोग्य सेविकांना तुटपुंजी भाऊबीज भेट 

एपीएमसीत स्ट्रॉबेरी दाखल 
पावसामुळे लांबणीवर पडलेला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरअखेर मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी आवक होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य हंगाम डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. ऑक्‍टोबरअखेरीस हे फळ बाजारात येण्यास सुरुवात होते; परंतु पावसाने उशिरा लागवड झाल्याने मोठ्या प्रमाणात आवक होण्यास विलंब होणार आहे. सध्या बाजारात 20 ते 25 क्रेट स्ट्रॉबेरी येत आहे. मागील वर्षीही एक महिना उशिरा हंगाम सुरू झाला होता. नोव्हेंबरअखेर मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उपलब्ध होईल. स्ट्रॉबेरीचा प्रतिकिलो दर सुमारे 80 रुपये आहे, असे मत व्यापारी अशोक उंडे यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Early arrival of Hanuman fruits in Navi Mumbai