भूकंपामुळे धक्के अन्‌ धडधड...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. गुरुवारच्या धक्क्याने झाेपडी काेसळल्याने एकाचा जीव गेला... 

मुंबई : रात्री डोळे बंद करून झोपताना उद्याची सकाळ आयुष्यात येईल की नाही, याचीही त्यांना खात्री नसते. रोज धरती हादरवून सोडणारे भूकंप इथे सहा महिन्यांपासून धक्के देत आहेत. घरांना, शाळा आणि इमारतींना तडे गेल्याने जीव मुठीत धरून ग्रामस्थ घरात तग धरून आहेत; पण प्रशासन म्हणते, काळजी करू नका. पाच रिश्‍टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झाला तरच धोका आहे... धो-धो पाऊस पडतोय. धोका दोन्हीकडून आहे. धरणी कंप करतेय आणि आभाळ फाटलेय. त्यामुळे जावे तरी कुठे? असा प्रश्‍न तलासरी आणि डहाणू तालुक्‍यातील भूकंपग्रस्तांसमोर उभा ठाकला आहे.

पालघर जिल्ह्यातीत तलासरी आणि डहाणू तालुक्‍यात गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असून त्याचा परिणाम बोर्डी व झाई बोरीगाव परिसरावरही झाला आहे. गुरुवारी (ता. २५) पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी बसलेला भूकंपाचा धक्का अतिशय तीव्र होता. धक्क्याने घर काेसळल्याने एकाला जीव गमवावा लागला. घरातील रहिवासी बाहेर पडले; मात्र धुवाधार पाऊस आणि वेगवान वारा असल्यामुळे त्यांना पुन्हा घरात जावे लागले. दरम्यान, पुढील दहा मिनिटांत आणखी चार धक्के बसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन घरातच बसावे लागले. प्रशासनातर्फे बोर्डी, जांबुगाव, रामपूर, बोरीगाव आदी परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

अभ्यासावर परिणाम
वारंवार होणाऱ्या भूकंपाने विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. वसतिगृहात राहणाऱ्या पाल्याच्या काळजीने पालकही धास्तावले आहेत. खबरदारी म्हणून अनेक पालक विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी शाळेत येत आहेत. 

आश्‍वासन हवेत 
भूकंपग्रस्त भागातील घरांना रेट्रो फिटिंग प्रणाली बसवण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने ते हवेत विरले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake shocks again in Palghar district, Near Mumbai

फोटो गॅलरी