कागदाच्या लगद्यातून साकारला बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे मुंबईकर पर्यावरणाबाबत जागरूक होत आहेत. पीओपी टाळून पर्यावरणस्नेही शाडूच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्याकडे अनेकांचा कल असतो. करी रोडमधील लोहार कुटुंबीय मात्र आठ वर्षांपासून कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती घडवत आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. लोहार कुटुंबियांनी बनवलेल्या मूर्ती थेट लंडन, अमेरिका, मस्कत, दुबई आदी ठिकाणी पाठवल्या  जातात.

कुटुंबातील प्रमिला लोहार यांनी सुरुवातीला केवळ पाच पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यासोबत आले. आज संपूर्ण लोहार कुटुंब पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडवण्यात रंगून गेले आहे. प्रमिला यांनी मूर्तिकलेचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात केली. पती आणि मुलगा सर्वेश यांच्या मदतीने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. लोहार यांचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबात नऊ सदस्य असून सर्वच जण कलेशी एकरूप झाले आहेत. घरातील प्रत्येक सदस्याला मूर्ती तयार करण्यास प्रमिला यांनीच शिकवले. कागद, डिंक आणि पोस्टर रंग आदींपासून सुबक मूर्ती बनवल्या जातात. 

एक फुटापासून चार फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्यांच्या गणेशमूर्तींमध्ये ३० ते ३५ प्रकारच्या डिझाईन पाहण्यास मिळतात. यंदाच्या वर्षी लोहार कुटुंबाने ५० मूर्ती तयार केल्या आहेत. नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व  मूर्ती आमच्या घरचेच सदस्य पूर्ण करतात, असे सर्वेश लोहार यांनी सांगितले.

अशी बनते मूर्ती
  कागदाचे बारीक तुकडे करून ते स्मॅश केले जातात. झाडाचा डिंक आणि व्हाईटिंग पावडर यांचे मिश्रण एकत्र केले जाऊन त्यांचा क्‍ले तयार होतो. 
  तयार झालेला क्‍ले मूर्ती बनवण्याच्या मोल्डमध्ये पेस्टिंग करून सुकवला जातो. त्यानंतर मूर्तीवर रंगकाम केले जाते. कागदाची मूर्ती सुकल्यावर कडक होते. 
  त्यामुळे ती सहज हाताळता येते. कागदाच्या मूर्ती पाच ते सहा तासांत पाण्यात विरघळतात.

Web Title: eco friendly ganesh idol made from a paper mill