शरद पवारांपुढे 'ईडी' बॅकफुटवर; चौकशीची गरज नसल्याचे पाठवले पत्र

टीम ई-सकाळ
Friday, 27 September 2019

संतप्त शरद पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, दुपारी ते ईडी कार्यालयात हजर होणार असताना, ईडीने ‘सध्या तुमच्या चौकशीची गरज नाही’, अशा आशयाचे पत्र पवार यांना पाठविल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या सगळ्या गोंधळात ‘ईडी’च बॅकफूटवर गेली असून, त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव होते. त्यावरून संतप्त पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, दुपारी ते ईडी कार्यालयात हजर होणार असताना, ईडीने ‘सध्या तुमच्या चौकशीची गरज नाही’, अशा आशयाचे पत्र पवार यांना पाठविल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या सगळ्या गोंधळात ‘ईडी’च बॅकफूटवर गेली असून, त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

'ईडी'ने झोपलेल्या राष्ट्रवादीला जागं केलं

ईडीने पत्रात काय म्हटले?
शरद पवार यांच्यावर होत असलेली कारवाई ही सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप देशभरातील विरोधी पक्षांनी सुरू केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पवार यांना याप्रकरणी पाठिंबा जाहीर केला. आज, पवार ईडी कार्यालयात जाणार होते. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल झाले. काही कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशाच वेळी ईडीकडून शरद पवार यांना एक पत्र पाठवण्यात आले. त्यात ‘शरद पवारांना मेलद्वारे पत्र पाठवलं असून सध्या चौकशीची गरज नाही, होऊ शकतं भविष्यात देखील कुठलीही चौकशी होणार नाही, गरज पडल्यास बोलावून घेतलं जाईल, सध्या तुम्ही ईडी कार्यालयात येऊ नका’, असे ईडीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार यांनी हे पत्र स्वीकारलेले नाही. शरद पवार ईडी कार्यालयात जाण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आता पुन्हा पवार यांच्या निवास्थानी जाणार आहेत.

मग पवारांचे नाव जाहीरच का केले? भुजबळांची प्रतिक्रिया 

आज काय घडले मुंबईत?

  1. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
  2. मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर; अनेकांना रोखले
  3. पवारांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त
  4. शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
  5. सरकारकडून मुस्कटदाबी केल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया

 

कार्यकर्त्यांची अडवणूक
दरम्यान, शरद पवार हे ईडी कार्यालयात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांची संख्या पाहता पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. तीन टप्प्यात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत तरीही आमच्या कार्यकर्त्यांना जागोजागी अडवण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ed writes letter to ncp leader sharad pawar no need of inquiry