कोरोनाचा असाही फटका, कोविडमुळे किडणीचे विकार बळावले

कोरोनाचा असाही फटका, कोविडमुळे किडणीचे विकार बळावले

मुंबई : केईएम रुग्णालयात मार्च ते ऑगस्ट दरम्यान कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणि पूर्वीपासून मुत्रापिंडाचा आजार असलेल्या 116 रूग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविड होण्यापूर्वी  डायलिसिसची आवश्यकता नसलेल्या 44 रुग्णांना आता कायमस्वरूपी डायलीसची गरज भासणार आहे. त्यामुळे श्वसनाचा आजार असलेला कोविड आता अनेक आजार बळावत असल्याचे दिसते.

कोरोना आजार होउन गेल्यानंतर तो केवळ फुफ्फुसांवरच परीणाम करून जातो असे नाही, तर तो आता मूत्रपिंडातील सौम्य समस्या असलेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडावर विपरीत परीणाम करता असल्याचे समोर आले आहे. कोविड विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी सौम्य मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांचे कोविडमधून बरे झाल्यानंतर मूत्रपिंडांचे कायमचे नुकसान होत असल्याची चिंताजनक बाब केईएम रुग्णालयातील  डॉक्टरांच्या निदर्शनास आली आहे.

अक्युअट किडनी इज्युरी (एकेआय) असलेल्या 116 रुग्णांना मार्च ते ऑगस्ट या कालावधीत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील 44 रुग्ण कोव्हिडमधून  बरे झाल्यानंतर त्यांना कायम स्वरूपी अती गंभीर स्वरूपाच्या  मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले. तसेच त्यांच्या मूत्रपिंडाचे नुकसान झाले. त्यामुळे अशा रुग्णांना आता कायमस्वरुपी डायलिसिसची आवश्यकता लागणार असून काहींना मूत्रपिंड प्रत्यारोपण करावे लागण्याची गरज निर्माण झाली आहे.

एकेआय असलेल्या कोविड रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. या 116 पैकी 51 जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की कोविड विषाणू मूत्रपिंडांवर हल्ला करतो. ज्यामुळे रक्तप्रवाहात गुठळ्या होतात, तसेच  मूत्रपिंडात रक्तवाहिन्या अडकतात त्यामुळे त्याचे संपूर्ण कार्य बिघडू शकते. तसेच, सायटोकिन स्ट्रोम, इम्युनिटी आणि मूत्रपिंडातील ऊती नष्ट करू शकते.

केईएम रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाळे यांनी सांगितले की, “कोविड चाचणी अहवाल पॉझिटीव्ह येण्यापूर्वी 116 रूग्णांपैकी 70 टक्के लोकांना मूत्रपिंडाचा सौम्य त्रास होता. मात्र त्यांना डायलिसिसची आवश्यकता नव्हती. 116 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले गेले. त्यावेळी त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. एकेआयमुळे त्यांना उपचारादरम्यान डायलिसिस आवश्यक लागली. त्याच 116 पैकी 21 रूग्ण बरे झाले. मात्र त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या रुग्णांना डायलिसिसची गरज लागली नाही.

यातील चिंताजनक बाब म्हणजे 116 जणांपैकी 44 जणांना डायलिसिसची गरज निर्माण झाली. “कोविडनंतरच्या झालेल्या उपचारानंतरही तीन महिन्यांहून अधिक काळ या रुग्णांना डायलिसिसवर करूनही त्यांची मूत्रपिंड बरे होण्याची चिन्हे नाहीत. 44 जणांना साधारणतः आठवड्यातून दोनदा डायलिसिस करण्याची आवश्यक्ता लागत  आहे. त्यापैकी काहींना लवकरच रेनल ट्रान्सप्लांट न मिळाल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावण्याची शक्यता असल्याचे ही डॉक्टरांनी सांगितले. 

या 44 रुग्णांपैकी 15 जणांची नोंद मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीमध्ये नोंदणीकृत आहे. त्यापैकी 55 वर्षीय रुग्ण गोरेगावचा रहिवासी आहे. एप्रिलमध्ये त्याचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला आता आठवड्यातून दोनदा डायलिसिसची गरज निर्माण झाली आहे. “त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तो मानसिक तणावाखाली आहे. परंतू  त्याला प्रत्यारोपण कधी होईल हे सांगणे कठीण आहे कारण सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीमध्ये 2 हजारा पेक्षा अधिक लोकं आहेत. कोविडमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

केईएमच्या क्रिटिकल कमिटीकडून प्रत्येक पोस्ट कोविड रुग्णाच्या रिकव्हरीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. यापूर्वी 22 कोविड रुग्णांना पुन्हा फुफ्फुसातील फायब्रोसिसने रूग्णालयात उपचारासाठी यावे लागले आहे. फुफ्फुसातील ऊतींचे तीव्र डाग ज्यामुळे श्वास लागणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे, दीर्घ कालावधीसाठी ऑक्सिजन गरज लागणे, तसेच कायमस्वरुपी एखादा आजार जडल्याचे समोर आल्याचे कमिटीमधील सदस्य डॉ जमले यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

effect of corona on recovered covid patients facing kidney problems

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com