पावसाचा भातशेतीला फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

सुरुवातीला सप्टेंबरमध्ये भातशेतीला फटका बसला होता. आता परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्‍यात फार मोठे नुकसान झाले.

म्हसळा (वार्ताहर) : चालू वर्षात झालेल्या विक्रमी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरासरी पर्जन्यमान ३५०० मि.मी. असताना आजपर्यंत सुमारे ५००० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीला सप्टेंबरमध्ये भातशेतीला फटका बसला होता. आता परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्‍यात फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. किंबहुना त्यांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून भातपिकाला एकरी ३५ हजार रुपये नुकसानभरपाई आणि गुरांसाठी वैरण मिळावे, अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाने केली आहे. 

महेश पवार, रामा लोणशीकर, मंगेश मुंडे, मंगेश म्हशीलकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तालुक्‍यात भातपिकाखालील क्षेत्र २४०० हेक्‍टर आणि नाचणीचे क्षेत्र ४०० हेक्‍टर आहे. वरी, तीळ, उडीद अशी अन्य पिकेही तालुक्‍यात काढली जातात. सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे पूर्वी ३१०० हेक्‍टरमध्ये घेत असलेले भातपीक आता केवळ  २४०० हेक्‍टरमध्ये घेतले जाते, असे महेश पवार यांनी सांगितले. या मोर्चाला तालुक्‍यातील मेंदडी, खरसई, तोंडसुरे, खारगाव (खुर्द), सकलप, केलटे, पानवे, देवघर, चिरगाव, घूम आदी गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पावसाचा मारा सुरूच आहे. भातपिकापासून नागली, वरी व अन्य बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.
- महेश पवार, शेतकरी, केलटे

तालुक्‍यात हळवी व उखारू दोन्ही भातशेतीचे आणि पर्यायाने गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे. हवामानातील सततच्या बदलाने मशागतीसाठी पिकावरील हेक्‍टरी खर्च वाढला आहे. भातपीक भिजल्यामुळे दर्जा कमी झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी.
- वैभव नाक्ती, तोंडसुरे

तालुक्‍यातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी शेतीच्या नुकसानीची तत्काळ संयुक्त पाहणी करणार आहेत. त्यानंतर ती माहिती जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी पाठवण्यात येईल.
- के. टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार, म्हसळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: effected on rice crop from rain