डोंगर खचून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आठ लाख भरपाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे उर्वरित पाऊस बाधितांचे पंचनामे सुरू 

ठाणे : गेल्या काही दिवसांत पावसाने झोडपून काढल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हाहाकार माजला होता. सोमवारी पावसाने जराशी उसंत घेतली असली, तरी शनिवारी व रविवारी कोसळलेल्या पावसाने सर्वत्र पाणी तुंबून अनेकांचे संसार पाण्यात बुडाले.

या सर्व पुराने बाधित झालेल्या नागरिकांचे पंचनामे करण्याचे काम ठाणे जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, कळव्यात डोंगर खचून मृत्युमुखी पडलेल्या व जखमीला नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

ठाणे तालुक्‍यातील कळवा येथील आतकोनेश्‍वर नगरमध्ये 30 जुलै रोजी डोंगर खचून मृत्युमुखी पडलेल्या बिरेंद्र जैसवार आणि सनी जैसवार या वडील व मुलाच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार असे आठ लाख रुपये आणि या घटनेत जखमी झालेल्या नीलम जैसवार यांना चार हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

दिवा-साबेगाव आदी परिसरासह ठाणे शहरात पाणी तुंबलेल्या भागातील उर्वरित पाऊस बाधितांचे ठाणे तालुका तलाठी मंडळामार्फत सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाण्याचे तहसीलदार आदिक पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight lakh compensation to relatives of those who died in the mountain