घशात अडकलं 1 रुपयाचं नाणं, 6 तास सुरु होता जीवन मरणाचा खेळ आणि अखेर...

भाग्यश्री भुवड
Friday, 17 July 2020

मुंबईतील अंधेरी येथील आठ वर्षीय मुलाने खेळता खेळता अचानकपणे 1 रुपयाचं नाणं गिळलं

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथील आठ वर्षीय मुलाने खेळता खेळता अचानकपणे 1 रुपयाचं नाणं गिळलं. ही बाब समजताच त्याच्या पालकांनी विविध हॉस्पिटलकडे धाव घेतली, मात्र सर्वच दवाखान्यातून नकार मिळाल्याने मुलाच्या पालकांनी अखेर नानावटी गाठलं. यानंतर तब्बल सहा तास विविध हॉस्पिटलच्या दारामध्ये मुलाला घेऊन सुरू असलेली पालकांची धडपड अखेर थांबली.

लाॅकडाऊनमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून याची काळजी घेण्यात आई-वडील व्यस्त असताना आता त्यांना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे. अंधेरीतील मुलाने घरी असताना अचानकपणे नाणे गिळले. ते त्याच्या अन्ननलिकेच्या वरील भागात अडकले. या ब्लॉकेजमुळे त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि काहीही खाऊ लागल्यास त्याला उलटी होत होती. पालकांनी स्थानिक नर्सिंग होममध्ये काढलेल्या एक्स-रेमध्ये नाणे दिसून आले. अनेक डॉक्टरांना भेटल्यानंतर ते नानावटी रुग्णालयात दाखल झालेत. 

सर्वात मोठी बातमी - मंत्री आदित्य ठाकरेंच्या खात्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यात महत्वाच्या बदल्या

मुलगा हाॅस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर सिनियर कन्सल्टंट आणि ईएनटी स्पेशलिलस्ट डॉ. अमोल पाटील यांनी मुलाची तपासणी केली. नाण्यामुळे मुलगा खूप अस्वस्थ होता. दरम्यान घशातील नाणं काढण्यात आणखी उशीर झाला असता तर अन्न नलिकेत संसर्ग होऊन मुलाला धोका होऊ शकतो या भीतीने त्यांनी इन्डोस्कोपिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक सर्व खबरदारी घेत डॉक्टर पाटील यांच्या सर्जिकल टीमने एसोफॅगोस्कॉपी- एंडोस्कोपिक प्रक्रिया केली. यामध्ये धातूच्या रॉडमध्ये सुरक्षितपणे लपवून ठेवल्या फोर्सेप्सच्या मदतीने डॉक्टरांच्या पथकाने काही वेळातच नाणे यशस्वीरित्या बाहेर काढले. 

मुंबईच्या इंट्रेस्टिंग बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

घशातील नाणं काढल्यानंतर काही काळ या लहानग्याला देखरेखीखाली ठेवलं गेलं. शस्त्रक्रियेनंतर मुलाला बरं वाटलं, त्याला जेवताना कोणताही त्रास होत नाही हे समजल्यावर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. नानावटी हॉस्पिटलमधील ई एन टी तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 

( संपादन - सुमित बागुल )

eight year boy gulped one rupee coin parents searched hospital for six hours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight year boy gulped one rupee coin parents searched hospital for six hours