मुंबईत भाजपचाच महापौर होणार : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

आवश्‍यक असलेल्या संख्याबळाबाबत विचारले असता त्याबद्दल माहिती देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

नागपूर : मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

भोसरी येथील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या न्या. झोटिंग समितीसमोर हजर राहण्यासाठी ते आज (सोमवार) नागपूरमध्ये आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई महापौर कोण होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु मुंबईच्या महापौरपदी भाजपचा नगरसेवक राहील, असे भाकीत त्यांनी वर्तविले. यासाठी आवश्‍यक असलेल्या संख्याबळाबाबत विचारले असता त्याबद्दल माहिती देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

नोटाबंदीचा कोणताही परिणाम मतदारांवर झालेला नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधकांनी वादळ उठविले होते. राज्यात झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. नोटाबंदीचा कोणताही परिणाम लोकांवर झाला नाही. मतदारांनी भाजपलाच मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: eknath khadase sure about bjp mayor in mumbai