eknath shinde dasara melava
eknath shinde dasara melavaEsakal

Eknath Shinde: "हे तर हमासशी गळाभेट घेतील..", महागद्दार म्हणत CM शिंदेचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे, त्यांच्याशीच युती करायचे काम हे करत आहेत. गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली; पण त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना गर्वसे कहो हम काँग्रेसी हैं, असे म्हणायची वेळ आली आहे. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे तुम्ही महागद्दार आहात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्ला चढवला.

शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा आज आझाद मैदानावर झाला. त्या वेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. या राज्यात सुखशांती असली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी ‘बीकेसी’ला मेळावा घेतला. त्यावर काही जण म्हणाले, तुम्ही शिवाजी पार्क सोडायला नको होते. जेथे बाळासाहेबांचे विचार बिनधास्त मांडता येतात, तेच आपले शिवतीर्थ होय. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती कधीच दिली आहे. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले, त्यामुळे तुम्ही महागद्दार आहात, असा घणाघात शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘लक्ष्य’ आज शिवसेनेबरोबर काँग्रेसही होते; मात्र शिवसेनेच्या नथीतून त्यांनी काँग्रेसवर शरसंधान केले. ‘आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फूल एक हाफ आहेत. आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभे करून घेतले नाही, त्यांच्यासोबत हे आज गेले. उद्या काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करतील,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही; मात्र आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभे करून घेतले नाही. त्यांच्यासमोर हे वाकतात, असे सांगून ‘तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही; तर पैशांवर आहे,’ असा आरोपही शिंदे यांनी केला.

हे तर हमासशी गळाभेट घेतील...
आज आझाद मैदानावर ‘आझाद’ असा मेळावा होत आहे. आझाद मैदानालादेखील वेगळा इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असल्याचा पुन्हा उल्लेखही त्यांनी केला. ‘शिवसैनिक मेला काय, जगला काय, यांना काहीच घेणे-देणे नाही. रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला आहे. ‘काँग्रेस, समाजवादी, एमआयएम यांना डोक्यावर घेताना इस्राइल-हमासची संघटना आहे, त्यांची हे गळाभेट घेतील. हिज्बुल, लष्कर-ए-तोयबा यांचीही भेट घेतील,’ अशी टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

उद्धव ठाकरे संधीसाधू
उद्धव ठाकरे यांना २००४ पासून राज्याचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती; पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच त्यांनी टुनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदासाठी संधीसाधू बनले,’ असा आरोप त्यांनी केला. कोरोनाच्या काळात मी बाहेर फिरत होतो. तुम्ही घरी पैसे मोजत होतात. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सिजनमध्ये पैसे खाल्ले. मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचे पांढरे करत होतात, असा आरोप शिंदे यांनी केला.

आमचे सरकार मजबूत

बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आपला चेहरा आरशामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला, तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्यासुद्धा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे.
‘मी मुख्यमंत्री झाल्यापासून सरकार पडणार... पडणार... म्हणत होते; मात्र आमचे सरकार मजबूत आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, आमच्याकडे २१० आमदार आहेत. जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला पदाची अपेक्षा नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईला कोणी तोडू शकत नाही...
चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही, असा दावा करताना ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याच शेजारी तुम्ही जाऊन बसले आहात. बाळासाहेब म्हणाले होते, ज्यावेळी माझी शिवसेना काँग्रेस होईल, त्या वेळी मी माझे दुकान बंद करेन, याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com