युती सरकार काळातील कामे बंद करायची का? एकनाथ शिंदेंचा भाजपला प्रतिसवाल

युती सरकार काळातील कामे बंद करायची का? एकनाथ शिंदेंचा भाजपला प्रतिसवाल

मुंबईः  कल्याणच्या आई तिसाई देवी पूलाचे सोमवारी उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. या कार्यक्रमादरम्यान थेट व्यासपीठावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्याचे दिसून आले. त्यानंतरही एकमेकांना टोलेबाजी करणे काही कोणी सोडले नसल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला कोणत्याही कामाचे श्रेय जाऊ नये यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युती सरकार यांच्या काळात ही कामे मंजुर झाल्याची आठवण सेनेला करुन देत होते. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजप आमदार चव्हाण यांना खडे बोल सुनावले. 

एकनाथ शिंदे यांनी युतीच्या काळातील कामे बंद करायची का? असा प्रतिसवाल उपस्थित केला. तर एरव्ही शिवसेनेला आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना कोंडीत पकडणारे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सेनेचे आभार व्यक्त करीत त्यांची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कल्याणच्या आई तिसाई देवी पूलाचे उद्घाटन आणि स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला. पूलाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सेना - भाजपने एकमेकांना पूलाच्या नामांतरावरुन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांवरुन एकमेकांना खुलेआम टोले लगावल्याचे दिसून आले. 

दुसरीकडे कार्यक्रम संपल्यानंतरही माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही सेना भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचे दिसून आले. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेला कोणत्याही कामाचे श्रेय लाटता येऊ नये यासाठी भाजप मनसेच्यावतीने प्रयत्न सुरु असून शिवसेनेला कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नेत्यांकडून होत आला आहे. 

सोमवारी भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी शहरात सुरु असलेली विकास कामे ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या काळात मंजुर झाली होती. ही कामे सुरु झाल्याने आम्हाला आनंद होत असल्याचे ते म्हणाले. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीच्या काळातील विकास कामे बंद करायची का ? असा प्रतिसवाल करत. सरकार येत असतात जात असतात, लोकांसाठी ही कामे करायची असतात. काम सुरु झाल्यानंतर त्याची योग्य प्रकारे पूर्तता झाली पाहिजे यासाठी सेना कायम प्रयत्नशील राहिली आहे असे ते म्हणाले.

रेंगाळलेल्या विकासकामांवरुन कायम शिवसेनेला तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र सोमवारी शिवसेनेचे कौतुक केले. पूलाच्या उद्घाटनासाठी कोणत्याही मुहूर्ताची वाट न पाहाता, नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत शिवसेनेने पूलाचे उद्घाटन केले याचा आनंद असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षांमध्ये सुरु असलेली ही टोलवाटोलवी पुढेही पाहायला मिळणार असून कोणत्या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण रंगते हे पहावे लागेल.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Eknath Shinde reply BJP Political parties attack each other over development works

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com