Ulhasnagar News : भरारी पथकाकडून 1 कोटीच्या वर कॅश असलेली बँकेची गाडी ताब्यात

निवडणुकीच्या कालावधीत कॅशवर व इतर बाबींवर वॉच ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने एका बँकेची गाडी ताब्यात घेतली.
cash car
cash carsakal

उल्हासनगर - निवडणुकीच्या कालावधीत कॅशवर व इतर बाबींवर वॉच ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने कॅशच्या क्यूआर कोडची तफावत असलेल्या एका बँकेची गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीत 1 कोटी 8 लाख रूपयांच्या वर कॅश मिळून आली असून, याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयकुमार शर्मा यांनी कॅश सीजर रिलीज कमिटीला रिपोर्ट सादर केलेला आहे.

उल्हासनगरात 9 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यातील एका भरारी पथक प्रमुख अजित घोरपडे, सचिन वानखेडे व पोलीस किशोर वंजारी यांनी परवा रात्री सेंचुरी कंपनीजवळ सीएमएस बँकेची गाडी अडवली. गाडीत मोठ्या प्रमाणावर कॅश असल्याने पथकाने क्यूआर कोडची मागणी केली.

मात्र त्यांच्याकडून खात्रीशीर उत्तर मिळाले नसल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार ती गाडी ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. इन्कम टॅक्स विभागाला पाचारण करण्यात आले.

गाडीतील कर्मचाऱ्यांकडे 25 ते 30 लाख रुपयांच्या कॅशचा क्यूआर कोड होता. मात्र सकाळपर्यंत मोजणी करण्यात आली असता गाडीत 1 कोटी 8 लाखाच्या वर कॅश मिळून आली असून त्याबाबतच्या क्यूआर कोड बाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी पडताळून ताब्यात घेतलेली कॅश जप्त करण्याची गरज नसल्याचा रिपोर्ट दिलेला आहे. इन्कम टॅक्स विभागाने क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलेले असले तरी जिल्हा स्तरावर कॅश सीजर रिलीज कमिटी असून काल रात्री त्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आदेश आल्यावर कॅश रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com