प्रचाराची सोशल मीडियावर सामसूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

भिवंडी - देशात आणि महाराष्ट्रात होऊन गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी देशातील निवडणूक प्रचाराचा चेहरामोहरा बदलून टाकला. ऑनलाईन प्रचाराचा नवा पायंडा या निवडणुकांदरम्यान भाजपने आणला. याचा प्रत्येक निवडणुकीत प्रभावी वापर करण्यासाठी सगळेच पक्ष तयार झाले आहेत. महापालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडेच हा प्रचार वाढीस लागत असताना भिवंडीत होऊ घातलेल्या निवडणुकीदरम्यान प्रचाराची सोशल माध्यमांवर सामसूम आहे.

भिवंडी - देशात आणि महाराष्ट्रात होऊन गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी देशातील निवडणूक प्रचाराचा चेहरामोहरा बदलून टाकला. ऑनलाईन प्रचाराचा नवा पायंडा या निवडणुकांदरम्यान भाजपने आणला. याचा प्रत्येक निवडणुकीत प्रभावी वापर करण्यासाठी सगळेच पक्ष तयार झाले आहेत. महापालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडेच हा प्रचार वाढीस लागत असताना भिवंडीत होऊ घातलेल्या निवडणुकीदरम्यान प्रचाराची सोशल माध्यमांवर सामसूम आहे.

राजकीय पक्षांकडून फेसबुकवर पक्षाचे पेज बनवणे, उमेदवारांच्या प्रचाराचे अपडेट लोकांपर्यंत पोहचवणे, पक्षाची भूमिका मांडणे असे कोणतेच प्रयत्न या निवडणुकीदरम्यान दिसून येत नाहीत. भाजप या तंत्राचा काही प्रमाणात वापर करत असले तरी अन्य पक्षांनी मात्र याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. फेसबुक लाईव्हसारख्या माध्यमाची सध्या सर्वत्र मोठी चर्चा असताना याकडेही पक्षाने दुर्लक्ष केले. उमेदवार पोस्टर, फलक, फेरी आणि व्हॉट्‌सॲप या माध्यमांचाच वापर आपल्या प्रचारासाठी करत आहेत. 

निवडणुकांदरम्यान प्रत्येक उमेदवारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्रचाराचा फंडा सर्वत्र लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे खर्चही अत्यंत कमी असल्याने अपेक्षित मतदारांपर्यंत पोहचणे सोपे जाते. दोन ते चार वर्षात या प्रचाराला विशेष महत्त्व आले आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक शहरानुसार फेसबुक पेज तयार केले असून, उमेदवारांच्या माहितीपासून ते त्यांच्या प्रचाराच्या फेरीपर्यंत सर्वच गोष्टी याद्वारे पोहचवल्या जातात. 

लाईव्हच्या सुविधेमुळे आता सभा, बैठका, भेटीगाठी, नेत्यांची भाषणे, नागरिकांशी संवाद या गोष्टी अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचवता येतात. हे माध्यम सर्वव्यापी बनत असताना भिवंडी निवडणुकीदरम्यान याचा वापर प्रभावीपणे करण्याकडे उमेदवारांचा कल अत्यल्प आहे. या भागात मुस्लिमबहुल प्रभाग असून, येथील ऑनलाईन साक्षरतेचे प्रमाणही कमी आहे. विशेष म्हणजे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून, त्यांची मतदार संख्या दीड लाखापर्यंत आहे. तेही या पद्धतीपासून दूर असल्याने या माध्यमांचा वापर केला जात नसावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ऑनलाईन प्रचारासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याचा तोटाही या भागातील उमेदवारांना सहन करावा लागतो आहे.

भाजपचे फेसबुक पेज सक्रिय
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून फेसबुक पेज सक्रिय करण्यात आले आहे. त्यावर सर्व कार्यक्रमाचे अपडेट तत्काळ पोहचवले जात आहेत. लाईव्हचा प्रभावी वापर करण्याबरोबरच काही तरुणांच्या मदतीने छोट्या क्‍लिप बनवून त्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. शिवसेनेचेही भिवंडी शहर हे पेज असले तरी ते अद्याप सक्रिय हाताळले जात नसल्याचे दिसत आहे. कोर्नाक, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही या प्रकारचा प्रचार करण्यात काहीसे मागे आहेत.

Web Title: election promotional social media