Mumbai : सुरक्षेशी जराही तडजोड नाही", एथर ई-स्कूटरचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Mumbai : सुरक्षेशी जराही तडजोड नाही", एथर ई-स्कूटरचा दावा

मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करताना गुणवत्तेला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. सुरक्षिततेच्या मुद्यांवर अजिबात तडजोड होता कामा नये. तसे केल्यासच आगीच्या घटनांपासून स्कूटर सुरक्षित रहाते, एथर एनर्जीच्या ई स्कूटरच्या उत्पादनात आम्ही याच बाबींवर लक्ष दिल्याने ती पूर्णपणे सुरक्षित झाली आहे, असे कंपनीचे रवनीतसिंह फोकेला यांनी सकाळला सांगितले.

या कंपनीच्या स्कूटरने खपासह अनेक बाबतीत विक्रम केले आहेत. फक्त तीन सेकंदात चाळीस किलोमीटरचा वेग गाठण्यातही या स्कूटरची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कमाल वेग ताशी ९० किमी, मधोमध बॅटरी-मोटर असल्याने साधलेला तोल, एका चार्जिंगमध्ये १४६ किलोमीटर अंतर नेणारी बॅटरी, एका मिनिटात दीड किमी अंतर जाईल एवढे चार्जिंग करू शकणारा फास्ट चार्जर या बाबी देशातील अन्य इ स्कूटरमध्ये नाहीत, असेही फोकेला म्हणाले.

हल्ली काही इ स्कूटरना चार्जिंगदरम्यान आग लागण्याच्या घटना घडल्या. हे टाळण्यासाठी आमच्या स्कूटरमध्ये सुरक्षेचे अनेक स्तर आहेत. सर्वात आधी डिझाईन मधेच सुरक्षेचे मापदंड-निकष (सेफ्टी स्टँडर्ड प्रोटोकॉल) पाळण्यात येतात. बॅटरीचे सेल, त्यातील रसायने, बाहेरील कव्हर, या प्रत्येक पातळीवर वेगवेगळे मॅकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आदी सुरक्षेचे तीन ते चार थर असतात. यातील एखादा थर अपयशी झाला तरी इतर थरांनी आग पसरण्यास अटकाव करावा व आग तेथेच संपून जावी हा यामागील हेतू असतो.

आम्ही आमची बॅटरी स्वतःच तयार करताना या सर्व बाबींवर लक्ष देतो. इलेक्ट्रॉनिक स्कूटरमधील बॅटरी हा सर्वात महत्वाचा भाग असून ती बॅटरी आयात वा जुळणी केलेली असली तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अर्थात अपघात केव्हाही होऊ शकतो, पण निर्मितीदरम्यान आपण सुरक्षेवर शंभर टक्के लक्ष दिलेच पाहिजे यावर आमचा कटाक्ष असतो, असेही त्यांनी दाखवून दिले.

आमच्या इ स्कूटरच्या चाचण्या राजस्थानच्या गरम हवेत तसेच डोंगराळ वातावरणातही घेतल्या आहेत. उत्पादन सुरु केल्यावर आक्रमकतेने बाजारात उतरण्यापूर्वी आम्ही गुणवत्ता, पुरवठा साखळी या सर्व बाबी तपासून स्थैर्याची वाट पाहिली. आता आमच्या दोन कारखान्यांमधून चार लाख ई स्कूटरचे दरवर्षी उत्पादन होते. मागणी वाढत असल्याने लौकरच आणखी तीन कारखाने सुरु करणार असून त्यानंतर दरवर्षी दहा लाख ई स्कूटरची निर्मिती करू. सध्या आमची देशात सहाशे चार्जिंग स्टेशन असून मार्चपर्यंत ही संख्या दीड हजार होईल, अशी खात्रीही फोकेला यांनी व्यक्त केली.

काही कंपन्या स्वस्त आणि हलक्या दर्जाच्या ई स्कूटर बनवतात, त्या मार्गाने आम्ही जात नाही. आम्ही गुणवत्ता, ताकद, सुरक्षा व चांगली कामगिरी यावर भर देतो - रवनीतसिंह फोकेला, चीफ बिझनेस ऑफिसर, एथर एनर्जी.