esakal | शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप, कृषिपंपांच्या वीज बिलावरील व्याजात सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप, कृषिपंपांच्या वीज बिलावरील व्याजात सवलत

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.  त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत.  राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप, कृषिपंपांच्या वीज बिलावरील व्याजात सवलत

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.  त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत.  राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक पार पडली.

या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. कृषी फिडर आणि वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. तसेच सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. 

यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी सरकारमार्फत दरवर्षी 1500 कोटी रुपये याप्रमाणे 2024 पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख  सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत.  कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याकरिता वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून वीज पुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राबविण्यात येणार आहे. 

अधिक वाचा-  ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी; भाजपचा टोला

कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषीपंपांची पाच वर्षापूर्वीची आणि पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज आणि विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे.

अधिक वाचा-  भाजपला ठाकरे सरकारचा दणका, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची होणार चौकशी

सदर  थकबाकीची रक्कम 3 वर्षात भरण्याची मुभा असणार आहे. पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर 100 टक्के सूट, दुसऱ्या वर्षी 30 टक्के सूट आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. सदर थकबाकी वसुलीच्या रक्कमेपैकी 33 टक्के रक्कम संबधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील, 33 टक्के रक्कम संबधित जिल्हयातील आणि 33 टक्के रक्‍कम राज्यातील कृषीपंप वीज जोडणीच्या पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे, अशा प्रकारे कृषीपंप धोरण राज्यात राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

electricity bills agricultural pumps 50 percent discount thackeray government decision

loading image
go to top