esakal | अकरावी प्रवेशाची CET परीक्षा 21 ऑगस्टला, जाणून घ्या सविस्तर माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

अकरावी प्रवेशाची CET परीक्षा 21 ऑगस्टला, जाणून घ्या सविस्तर माहिती

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) राज्य शिक्षण मंडळाकडून 21 ऑगस्ट रोजी सीईटी (CET) ही सामाईक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाणार आहे. त्यासाठीच कार्यक्रम आज राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर (SSC Syllabus) आधारित ही परीक्षा असून 100 गुणासाठी असून ती दोन तासाच्या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने (Offline Exam) घेतली जाणार आहे. ( Eleventh Admission CET exam on twenty first Augast-nss91)

सीईटी ही परीक्षा ऐच्छिक स्वरुपाची असली तरी राज्यभरातील ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (ओ एम आर) प्रश्नपत्रिका दिली जाणार असून सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाणार आहे. अकरावीचे सीईटीसाठी राज्य शिक्षण मंडळाने http://cet.mh-ssc.ac.in असे संकेतस्थळ सुरु केले असून मंगळवारी 20 जुलै पासून सकाळी 11.30 वाजता यावर विद्यार्थ्यांना आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी 26 जुलैपर्यंत चालणार आहे यासाठीची तपशीलवार माहिती मंडळाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: कांदिवलीत पावसाचा धुमाकूळ, एकाच चाळीत 9 झोपड्या जमीनदोस्त

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यासोबतच सीबीएसई आयसीएसई या आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी ही द्यावी लागणार आहे. मात्र ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक आहे. 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून ती 8 माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सेमीइंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्र निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमांचा विचार करून प्रश्नपत्रिका त्यांना उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

या विषयावर आधारित असेल परीक्षा

अकरावीची सीईटी ही दहावीच्या इंग्रजी, गणित व सामाजिक शास्त्रे (इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.100 गुणाच्या एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार विषयांसाठी प्रत्येकी 25 गुण दिले जाणार आहेत.

विषय . गुण

इंग्रजी - 25,

गणित (भाग 1 व भाग 2)- 25

विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग 1 व भाग 2)- 25

सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) 25

एकूण -. 100

या भाषेमधून मिळतील प्रश्नपत्रिका

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या सीईटीसाठी इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू,सिंधी, तेलगू, हिंदी या आठ भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत. सेमी इंग्रजी या माध्यमात निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये इंग्रजी गणित व विज्ञान या विषयाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांना आवेदन पत्रात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध असतील. यामध्ये शिक्षण मंडळाकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर जो 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता त्यातील कोणताही भाग या परीक्षेत घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: भांडूपमध्ये भिंत कोसळून सोहमचा दुर्देवी मृत्यू, घार पक्षाला जीवदान!

नियमित विद्यार्थ्यांना निशुल्क परीक्षा

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील नियमित विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सन 2021 पूर्वी जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले होते, अथवा प्रविष्ट झाले होते अशा विद्यार्थ्यांना सोबतच सीबीएसई आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे, हे शुल्क डेबिट क्रेडिट अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरण्याचा पर्याय मंडळाकडून देण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रासाठी संख्येचा होणार विचार

अकरावी सीईटी परीक्षा आणि त्यासाठीचे केंद्र हे विद्यार्थ्यांकडून अवेदन पत्रात नमूद केलेल्या जिल्हा व तालुका शहरी भाग यांचा विचार करूनच निश्चित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यात परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील, त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार

सीईटीच्या परीक्षेनंतर मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास ते नोंदवण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यासाठी हा कालावधी निश्चित करून नमुना उत्तरसुची सोबत प्रसिद्ध केली जाणार आहे.नमुना उत्तरसूची प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन त्याबाबत मंडळ स्तरावर पडताळणी केली जाणार आहे. अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतरच निकालाबाबत स्तरावर कार्यवाही केली जाणार असल्याची माहितीही मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

loading image