अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक रखडले ; संकेतस्थळावरही माहिती अपुरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कट ऑफची माहिती उपलब्ध होत नाही. शिक्षण विभागाने तातडीने वेळापत्रक जाहीर करणे आवश्‍यक आहे. 

- वैशाली बाफना, सिस्कॉम संघटनेच्या संचालक, शिक्षण प्रमुख

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांची अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे; मात्र शिक्षण विभागाने अद्याप अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत. 
प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांनी अडीचशे ते दीडशे रुपये दिले आहेत; मात्र त्यात महाविद्यालयांचे कट ऑफ आणि शुल्काची माहिती नाही. संकेतस्थळावरही महाविद्यालयाच्या कट ऑफची माहितीच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. 

गेल्या वर्षीपासून अकरावी प्रवेशाचे राज्यभराचे एकच वेळात्रक जाहीर केले जाते. दहावी निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी अर्ज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतो, तर दहावी निकाल जाहीर होताच प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा भरण्याची प्रक्रिया आणि गुणवत्ता यादीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते; मात्र यंदा वेळापत्रक तयार करण्यास विलंब झाल्याने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक रखडले आहे. याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. 

अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत यंदा महाविद्यालयाचे कट ऑफ आणि शुल्काची माहिती दिलेली नाही. पुस्तक छापाईचा खर्च वाचवण्यासाठी शिक्षण विभागाने माहिती पुस्तिकेचा आकार लहान करून "कट ऑफ' आणि इतर माहिती प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. निकालानंतर मिळालेल्या गुणांमध्ये कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल, याची चाचपणी पालकांकडून सुरू आहे. कट ऑफची माहिती संकेतस्थळावरही उपलब्ध नसल्याने माहिती पुस्तिकेसाठी शहर विभागातील विद्यार्थ्यांकडून अडीचशे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून दीडशे रुपये का घेण्यात आले, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

वेळापत्रक सोमवारी 

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना कट ऑफची माहितीही सोमवारनंतर पाहता येईल, अशी माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. 

Web Title: The eleventh entrance schedule was pending